अड्याळच्या थरारक खून प्रकरणात आरोपीला मरेपर्यंत कोठडी; भंडारा सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

0
24

हंसराज, भंडारा :- व्यावसायिक वादातून आणि पैशांच्या व्यवहारातील रागातून मित्राची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला भंडारा जिल्हा व सत्र न्यायालयाने आजन्म कारावासाची कठोर शिक्षा सुनावली आहे. यासोबतच आरोपीला ४० हजार रुपयांचा द्रव्यदंडही ठोठावण्यात आला आहे. या निकालामुळे गुन्हेगारांमध्ये धडकी भरली असून, पोलीस तपासाचे आणि सरकारी पक्षाच्या युक्तिवादाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

नेमकी घटना काय? सदर घटना ३० जून २०२२ रोजी अड्याळ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या लांडेझरी-इटगाव जंगल परिसरात घडली होती. मृत अनिकेश अजबराव क्षीरसागर (वय ४८, रा. श्रीरामनगर, चिखली ले-आऊट, नागपूर) आणि आरोपी संदेश राजेंद्र क्षीरसागर (वय २४, रा. साईकृष्णा रेसिडेन्सी, नागपूर) हे एकमेकांच्या परिचयाचे होते. त्यांच्यात व्यावसायिक आर्थिक व्यवहारावरून वाद सुरू होता. आरोपी संदेश याने व्यवसायात २.५० लाख रुपयांचा घोटाळा केल्याचा संशय अनिकेश यांना होता. याच कारणावरून मृताने आरोपीला शिवीगाळ करत मारहाण केली होती. या अपमानाचा बदला घेण्याच्या उद्देशाने आरोपीने अनिकेश यांची हत्या करण्याचा कट रचला.

घटनेच्या दिवशी आरोपीने अनिकेश यांना जेवणाच्या बहाण्याने लांडेझरीच्या जंगलात नेले. तेथे संधी साधून आरोपीने आपल्या बॅगेतून लोखंडी कोयता काढला आणि अनिकेश यांच्या मानेवर, हातावर व खांद्यावर सपासप वार करून त्यांची निर्घृण हत्या केली. याप्रकरणी चंद्रशेखर पुरुषोत्तम चौधरी (वय ३३, रा. इटगाव) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अड्याळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

अड्याळ पोलिसांनी या प्रकरणात भारतीय दंड विधान (IPC) कलम ३०२, ४०४, भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५ आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अन्वये गुन्हा नोंदवला होता. जिल्हा व सत्र न्यायाधीश (कोर्ट क्र. १) भारती काळे यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आणि पुराव्यांची पडताळणी केल्यानंतर आरोपीला दोषी ठरवले. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २३५(२) अंतर्गत कलम ३०२ नुसार आरोपीला आजन्म कारावास आणि ४०,००० रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

या गुन्ह्याचा तपास तत्कालीन ठाणेदार तथा सहायक पोलीस निरीक्षक सुधीर बोरकुटे यांनी अतिशय कौशल्याने केला. त्यांनी न्यायालयात भक्कम पुरावे आणि दोषारोपपत्र सादर केले. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता आर. एन. खत्री यांनी प्रभावीपणे बाजू मांडली.

ही संपूर्ण कारवाई भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी (पवनी) ज्योतिका इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली. तपासात तत्कालीन ठाणेदार धनंजय पाटील, ठाणेदार सचिन तायवाडे, सपोनि प्रशांत साखरे आणि कोर्ट पैरवी अंमलदार पोलीस हवालदार सुरेश भगत यांनी मोलाचे सहकार्य केले.