चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागामार्फत एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत मंगळवार, २४ फेब्रुवारी रोजी बिनबा गेट बाहेरील परिसरातील कुमार ट्रान्सपोर्ट येथे तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वाट्या व पेले यांचे १२ डबे आढळून आले. सदर साहित्य हे घुग्घूस येथील त्रिमूर्ती सेलिब्रेशन या व्यावसायिकाचे असल्याचे निदर्शनास आले. शासनाच्या आदेशानुसार एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकवर बंदी असल्याने संबंधित १२ डबे साहित्य जागेवर जप्त करण्यात आला तसेच संबंधितांकडून ५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.
ही कारवाई सहाय्यक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. अमोल शेळके, उपमुख्य स्वच्छता अधिकारी भूपेश गोठे, प्रभारी स्वच्छता निरीक्षक शुभम खोटे,एनडीएस पथकातील शुभम चिंचेकर, राहुल गगपल्लिवार व पूनम समुद्रे यांनी संयुक्तपणे केली.
महानगरपालिकेमार्फत नागरिक व व्यावसायिकांनी एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर टाळावा, असे आवाहन करण्यात आले असून नियमांचे उल्लंघन आढळल्यास यापुढेही कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.