spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

‘ब्रिडिंग चेकर्स’च्या कामाची अतिरिक्त आयुक्तांनी केली पाहणी  

संत ज्ञानेश्वर नगर येथे  वसुमना पंत यांनी दिली भेट

नागपूर, ता. १ : नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे शहरात डासांमुळे उद्भवणाऱ्या आजारांबाबत झोनस्तरावर उपाययोजना केल्या जात आहेत. सध्या पारेषण काळ असल्यामुळे डासांमुळे उद्भवणारे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या आजारांचा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरात प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या हेतूने गुरुवारी (ता. ३१) अतिरिक्त आयुक्त  वसुमना पंत यांनी ‘ब्रिडिंग चेकर्स’ सर्वेक्षण च्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.

मंगळवारी झोन अंतर्गत कोराडी मार्गावरील संत ज्ञानेश्वर नगर येथे करण्यात आलेल्या प्रत्यक्ष पाहणी प्रसंगी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, मंगळवारी झोनचे झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. अतीक उर रहमान खान यांच्यासह झोनचे मलेरिया आणि फायलेरीया निरीक्षक उपस्थित होते.

वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे सध्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. पारेषण काळ असल्यामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासारख्या किटकजन्य व विशेषतः डासजन्य आजारांचा धोका वाढू लागला आहे. २८ जुलै २०२५ रोजी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेत आढावा बैठक घेण्यात आली होती. त्यात आयुक्तांनी डासांमुळे उद्भवणाऱ्या आजारांबाबत प्रभावी उपाययोजना करण्याबाबत निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने शहरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेद्वारे शुक्रवार १ ऑगस्ट २०२५ पासून आशा सेविकांद्वारे घरोघरी सर्वेक्षणला सुरुवात होत आहे. यासोबतच शहरातील वस्त्या, मोकळे भूखंड आणि घरोघरी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांवर देखील भर दिला जात आहे. त्याच अनुषंगाने गुरुवारी (ता. ३१) अतिरिक्त आयुक्त  वसुमना पंत यांनी संत ज्ञानेश्वर नगर येथे भेट देऊन प्रत्यक्ष क्षेत्रात सुरु असलेल्या उपाययोजनांची पाहणी केली.

मनपाच्या ‘ब्रिडिंग चेकर्स’द्वारे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासारख्या आजारांच्या संशयित किंवा पॉझिटिव्ह रुग्णांच्या घरी भेट देऊन सर्वेक्षण केले जाते. घरातील पाणी जमा असलेली भांडी, साहित्य तपासली जातात. अशा ठिकाणी डास अळी आढळल्यास ती नष्ट केली जाते. परिसरात आढळलेल्या डासांचे देखील परीक्षण करून ते कुठल्या आजाराचे संप्रेरक आहेत याची देखील शहानिशा केली जाते. परिसरात औषध फवारणी, धूर फवारणी केली जाते. खुल्या भूखंडामध्ये पाणी साचलेले आढळल्यास तिथे डास अळीनाशक तेल(एमएलओ ऑईल) टाकून डास अळी नष्ट करण्याची कार्यवाही केली जाते. या सर्व प्रक्रियेची मनपा अतिरिक्त आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी केली व कामावर समाधान व्यक्त केले. त्यांनी यावेळी ‘ब्रिडिंग चेकर्स’ सोबत संवाद साधला व त्यांचेकडून संपूर्ण प्रक्रिया समजून घेतली.

वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी ‘ब्रिडिंग चेकर्स’द्वारे डासांचा लारवा शोधून काढणे आणि तो नष्ट करणे व पुढील औषध फवारणी यासंदर्भातील सविस्तर माहिती अतिरिक्त आयुक्तांना दिली. ‘ब्रिडिंग चेकर्स’द्वारे मनपाच्या दहाही झोनअंतर्गत जून ते जुलै २०२५ या महिन्यात २८५२३६ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. यातील १२०२१ घरामंध्ये लारवा आढळून आला.

केटी नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधेचा घेतला आढावा

अतिरिक्त आयुक्त  वसुमना पंत यांनी केटी नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राला देखील भेट दिली व येथील सुविधेचा आढावा घेतला. यावेळी धरमपेठ झोनच्या झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा देवस्थळे व केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. ग्रीष्मा धिंग्रा उपस्थित होते. केटी नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रोज होणारी रुग्ण तपासणी, त्यांना पुरविण्यात येणारी औषधे यासोबतच केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या भागातील डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासारख्या आजारांची जोखीमग्रस्त स्थळे या सर्वांची माहिती यावेळी पंत यांनी घेतली.

Popular Articles