यवतमाळ :- डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ केंद्रीय कापूस संस्था, नागपूर, वस्त्रोद्योग मंत्रालय व कृषी विभाग, यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कापूस लागवड प्रकल्प अंतर्गत अतिसघन व सघन कापूस लागवड तंत्रज्ञान विषयक शेतकरी मेळाव्याचे आयोजन दि. २० जानेवारी रोजी झाडगाव, ता. राळेगाव, येथे करण्यात आले.
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. शरद गडाख हे होते. यावेळी संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदिरवाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, तंत्रज्ञानाचे जनक दादा लाड, सहयोगी संशोधन संचालक डॉ. श्रीकांत अमरशेट्टीवर, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दीपक कच्छ्वे, प्रयोगशील शेतकरी माऊली कापसे, बाबासाहेब कपिले, नाबार्डचे अतुल इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.![]()
गडाख यांनी कापूस पिकाच्या पारंपरिक लागवड पद्धतीत बदल करून आधुनिक व शिफारसीत अतिसघन कापूस लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादन वाढवावे, असे आवाहन केले. तसेच डॉ. पं. दे. कृषी विद्यापीठामार्फत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक आदर्श गाव उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली. डॉ. धनराज उंदिरवाडे यांनी कापूस व रब्बी पिकांवरील कीड व रोग व्यवस्थापनाबाबत सखोल मार्गदर्शन केले.
दादा लाड यांनी कापूस पिकातील घन लागवड, गळफांदी काढणे व शेंडा खुडणे या तंत्रज्ञानाविषयी माहिती दिली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी शासकीय योजनांची माहिती दिली. सघन कापूस लागवड तंत्रज्ञान वापरून विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल चव्हाण यांनी केले, संचालन डॉ. प्रमोद मगर यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. गणेश काळूसे यांनी केले.