कंत्राटदारांचे बिल थकणार नाही; राज्य सरकारकडून ७,५०० कोटींची तरतूद
वर्धा २२ : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी वर्धा भेटीदरम्यान कंत्राटदारांना मोठा दिलासा दिला आहे. कोणत्याही कंत्राटदाराचे बिले प्रलंबित राहू देणार नाही, असे स्पष्ट करत राज्य सरकारने यासाठी ७,५०० कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती त्यांनी दिली. पत्रकार परिषदेत बोलताना पवार म्हणाले, “अर्थमंत्री म्हणून मी खात्री देतो की सर्व प्रलंबित देयकांची लवकरच निकड काढली जाईल.” यावेळी पत्रकारांनी कंत्राटदारांनी आत्मदहनासारख्या टोकाच्या इशाऱ्यांबाबत विचारणा केली असता, पवार म्हणाले की, “काळजी करण्याची गरज नाही, सरकार या विषयाकडे गंभीरतेने पाहत आहे.” दारुबंदीबाबत विचारले असता पवारांनी स्पष्ट केले की, वर्धा ही महात्मा गांधीजींची भूमी आहे, त्यामुळे येथे दारूबंदी कायम राहणारच. महसूल गमावला जात असला तरीही या निर्णयामध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. मात्र, बेकायदेशीर दारू विक्रीसारख्या समस्यांवर पोलिस आणि प्रशासन संयुक्तरित्या कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. औद्योगिक विकासावर भाष्य करताना पवार म्हणाले की, पर्यावरणीय अडचणींमुळे काही उद्योगांना मर्यादा येत असल्या, तरीही कापूस प्रक्रिया उद्योगासारखे प्रकल्प वर्ध्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सेवाग्राम विकास आराखड्याला यावर्षीच मंजुरी दिली जाईल, असे सांगत त्यांनी स्थानिक नागरिकांच्या सूचना व गरजांचाही त्यात समावेश केला जाईल, असे आश्वासन दिले.




