– ८ ते २५ एप्रिलदरम्यान राज्यातील ३६ जिल्ह्यांत सर्वेक्षण; विविध योजनांद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना संधी
गडचिरोली :- महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या स्वायत्त संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी ‘अमृत परिवार सर्वेक्षण अभियान’ राबविण्यात येत असून या अभियानास दि. ८ एप्रिल २०२६ पासून प्रारंभ झाला आहे. हे सर्वेक्षण दि. २५ एप्रिल २०२६ पर्यंत राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांत राबविण्यात येणार असून आवश्यकता भासल्यास कालावधी वाढविण्याची शक्यता आहे.
अमृत संस्थेमार्फत अशा खुल्या प्रवर्गातील जाती-जमातींना लक्ष्य केले जाते, ज्यांना स्वतंत्र शासकीय विभाग, संस्था किंवा महामंडळांच्या योजनांचा लाभ मिळत नाही. या लक्षित गटामध्ये ब्राह्मण, सिंधी, मारवाडी, गुजराती, पटेल, राजपूत, कायस्थ, अय्यंगार, नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, भूमिहार, ठाकूर, जाट, कानबी, वैश्य आदी मिळून सुमारे २५ जातींचा समावेश असून सर्वेक्षणाअंती या यादीत वाढ होण्याची शक्यता आहे.
या संस्थेमार्फत व्यक्तिमत्व विकास, औद्योगिक व प्रगत कौशल्य प्रशिक्षण, रोजगारक्षम कौशल्य विकास, उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य, स्पर्धा परीक्षा प्रोत्साहन तसेच उद्योग-व्यवसाय वृद्धीसाठी व्याज परतावा योजना अशा विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते. लक्षित गटाच्या गरजांनुसार अधिक मूल्यवर्धित योजना तयार करण्यासाठी हे सर्वेक्षण महत्त्वाचे ठरणार आहे.
सदर सर्वेक्षणाद्वारे लक्षित गटातील कुटुंबांची संख्या निश्चित करणे, त्यांच्या अपेक्षा जाणून घेणे, स्थानिक संसाधने व उपलब्ध कौशल्यांचा अभ्यास करणे आणि त्या आधारे नवीन योजना तयार करणे हा उद्देश आहे. याचबरोबर, अमृत संस्थेच्या विविध योजनांची माहिती अधिकाधिक कुटुंबांपर्यंत पोहोचविणे आणि भावी उपक्रमांसाठी नागरिकांच्या सूचना व मत जाणून घेणे हा दुहेरी हेतू या अभियानातून साध्य केला जाणार आहे.
या कालावधीत अमृत संस्थेचे प्रतिनिधी लक्षित गटाशी प्रत्यक्ष संपर्क साधणार असून विविध सामाजिक संस्था, संघटना व मंडळांमार्फतही प्रातिनिधिक माहिती संकलित केली जाणार आहे. तसेच संबंधित कुटुंबे, संस्था किंवा संघटनांनीही अमृतच्या जिल्हा किंवा विभागीय व्यवस्थापकांशी संपर्क साधून आपली नोंदणी करावी व योजनांची माहिती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे (मुख्यालय) येथे संपर्क साधता येईल. संपर्क क्रमांक ९७३०१५१४५० व ९११२२२६१५४, ई-मेल info@mahaamrut.org.in तसेच संकेतस्थळ https://mahaamrut.org.in येथे माहिती उपलब्ध आहे.