spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

अण्णाभाऊ साठेंच्या स्मृतींना अभिजात सन्मान मिळावा : जयदीप कवाडे

 
पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे भव्य रॅलीचे आयोजन

नागपूर २ : लोकशाहीर आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते, तर वंचित, श्रमिक, भटक्या-विमुक्त समाजाच्या वेदनांना आवाज देणारे सामाजिक क्रांतिकारक होते. त्यांच्या स्मृतींना केवळ दगडी स्मारकात न अडकवता, त्या स्मृतींना अभिजात सन्मान मिळायला हवा. मुंबईतील त्यांची वास्तू ही संघर्षाची साक्ष आहे, तिला स्मारकाचा दर्जा मिळावा. दीक्षाभूमीत त्यांच्या नावाने प्रेरणादायी स्मारक उभारले जावे. तसेच त्यांच्या नावाने असलेल्या योजनांना वाढीव निधी देऊन त्या प्रभावीपणे राबवाव्यात. अण्णा भाऊ यांच्याविचारांना धोरणांत स्थान देणे ही खरी त्यांची जयंती ठरेल, असे प्रतिपादन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा)  जयदीपभाई कवाडे यांनी राज्य सरकारला आवाहन केले. जयदीप कवाडे शुक्रवारी नागपूर येथे आयोजित अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्त भव्य सामाजिक रॅलीच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. या रॅलीची सुरुवात दीक्षाभूमी येथून झाली आणि समारोप अण्णाभाऊ साठे चौकात करण्यात आला.  प्रारंभी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला जयदीप कवाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महिला आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या  प्रतिमा ताई जयदीप कवाडे, प्रदेश संघटक कपिल लिंगायत, विदर्भ प्रदेश अध्यक्ष विजयजी पाटील, शहराध्यक्ष कैलास बोंबले, शहर महासचिव दिलीप पाटील, महाराष्ट्र प्रदेश चित्रपट सेनेचे अध्यक्ष सुमित डोंगरे, पूर्व विदर्भ महासचिव डॅनी शामकुंवर, पूर्व विदर्भ महिला आघाडी अध्यक्षा सुचिता कोटांगळे, महिला आघाडी नागपूर अध्यक्षा प्रतिभा मानवटकर, विदर्भ संघटक अंकीत धुपे, नागपूर उपाध्यक्ष रीजवान शेख, दक्षिण पश्चिम अध्यक्ष स्वप्निल महाल्ले, सोमलवाडा अध्यक्ष सुनील कांबले, पूर्व नागपूर अध्यक्ष शितल बोरकर, पूर्व नागपूर संघटक सुनील मैश्राम, नागपूर ग्रामीण महिला आघाडी अध्यक्षा सुनिता ताई शेंडे, नागपूर जिल्हा उपाध्यक्ष सोपान मानवटकर, अजय वासनिक, रमेश गेडाम, श्रृषिकेश राऊत आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.

पुढे बोलतांना जयदीप कवाडे म्हणाले की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते, तर सामाजिक परिवर्तनाच्या ज्वालामुखीचे नाव होते. त्यांनी आपल्या लेखणीतून वंचित, शोषित, उपेक्षित समाजाला केवळ आवाजच दिला नाही, तर त्या वेदनांना संघर्षाचे आणि परिवर्तनाचे स्वरूप दिले. त्यामुळे त्यांच्या स्मृती फक्त जयंतीपुरत्या मर्यादित राहू नयेत, तर त्या शासनाच्या धोरणांमध्ये उतरणे ही काळाची गरज आहे, जयदीप कवाडे पुढे बोलतांना म्हणाले की, मुंबईतील अण्णा भाऊ यांच्यावास्तूला स्मारकाचा दर्जा मिळायला हवा. ही वास्तू त्यांच्या संघर्षाची साक्ष आहे. ती संगमरवरी दगडांची नव्हे, तर प्रेरणादायी स्मरणस्थळ असावी. त्याचबरोबर दीक्षाभूमी परिसरात अण्णाभाऊ साठेंच्या स्मृतीला समर्पित भव्य स्मारक उभारावे, जे सामाजिक क्रांतीचा केंद्रबिंदू ठरेल. स्मारके फक्त दगडांची असू नयेत, ती कृतीची ठराव असावी. अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने सुरू असलेल्या योजनांमध्ये निधी वाढवण्याचीही त्यांनी जोरदार मागणी केली. सध्या या योजना केवळ कागदावर आहेत, निधी अत्यल्प आहे. हा अपमान थांबायला हवा. वडार, बंजारा, कंजरभाट, पारधी, गोंधळी यांसारख्या समाजांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करून शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक संधी उपलब्ध करून द्याव्यात. यासाठी भरीव अर्थसंकल्पीय तरतूद करावी, असे स्पष्ट करत जयदीप कवाडे यांनी मागण्या शासनापुढे मांडल्या.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी बोलताना जयदीप कवाडे म्हणाले, फेसबुकवर फोटो टाकून, भाषणे करून आपण अण्णाभाऊ यांना विसरतो. अण्णाभाऊ यांचे नाव घेतल्यावर समतेच्या मूल्यांची कृतीही दिसली पाहिजे. त्यांचा सन्मान केवळ घोषणांनी नव्हे, तर ठोस धोरणांतून झाला पाहिजे.

ही जबाबदारी फक्त आमची नाही, तर शासन, समाज व संपूर्ण व्यवस्थेची आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानून त्यांनी सांगितले की, अण्णाभाऊ यांच्या विचारांना शासनाच्या केंद्रस्थानी आणण्यासाठी लढा आणखी व्यापक आणि निर्णायक होणार आहे. या रॅलीदरम्यान ‘अण्णाभाऊ अमर रहे’, ‘सामाजिक न्याय आमचा हक्क आहे’, ‘अण्णाभाऊ यांची गाठ बाबासाहेबांच्या विचारांशी’ अशा घोषणा देण्यात आल्या. पीरिपाच्या रॅलीत सामाजिक चेतनेचा गजर झाला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.