spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

SIR अंतर्गत कागदपत्र पडताळणीसाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती

हंसराज, भंडारा :- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रात सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत दावे व हरकतींच्या कालावधीत प्राप्त होणाऱ्या कागदपत्रांची सत्यता पडताळण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सावन कुमार यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

सुधारित कार्यक्रमानुसार ३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती निकाली काढण्यात येणार आहेत. या कालावधीत जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांतील मतदार नोंदणी अधिकारी (ERO) यांच्याकडून ‘नो मॅपिंग’ व ‘अॅनोमलीज’ श्रेणीतील मतदारांना सुनावणीसाठी नोटिसा पाठविण्यात येणार आहेत.

सुनावणीच्या वेळी संबंधित मतदारांनी गणना पत्रकाच्या मागील बाजूस नमूद केलेली कागदपत्रे ERO/AERO यांच्या कार्यालयात सादर करावयाची आहेत. या कागदपत्रांची पडताळणी करून अहवाल जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर करण्याची जबाबदारी नियुक्त नोडल अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.

विविध विभागांकडे पडताळणीची जबाबदारी

केंद्र व राज्य शासन, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, बँका, टपाल विभाग, LIC, स्थानिक स्वराज्य संस्था, शिक्षण विभाग, महसूल विभाग आणि निबंधक कार्यालयांकडून निर्गमित कागदपत्रांची सत्यता संबंधित विभागांकडून तपासण्यात येणार आहे. जिल्हा कोषागार अधिकारी मंगला डोरले यांच्याकडे शासकीय कर्मचारी व निवृत्तीवेतनधारकांची ओळखपत्रे तसेच निवृत्तीवेतन प्रदान आदेशांच्या पडताळणीची जबाबदारी देण्यात आली आहे. LIC चे वरिष्ठ शाखा व्यवस्थापक मनोज भोतमांगे, जिल्हा अग्रणी प्रबंधक जी. बो. तईकर आणि मुख्य पोस्टमास्तर प्रमोद भूरे यांच्याकडे अनुक्रमे LIC, बँका व टपाल विभागाशी संबंधित कागदपत्रांच्या पडताळणीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) उमेश नंदागवळी व जिल्हा सहआयुक्त, नगर पालिका प्रशासन चंदन पाटील यांच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्था व जन्म प्रमाणपत्रांच्या पडताळणीचे काम देण्यात आले आहे. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रवींद्र सोनटक्के व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) निर्मला माने यांच्याकडे शैक्षणिक व मॅट्रिक्युलेशन प्रमाणपत्रांच्या पडताळणीची जबाबदारी आहे.

उपविभागीय अधिकारी अंजली भोसले, माधुरी तिखे व स्वाती देसाई यांच्याकडे कायमस्वरूपी रहिवासी प्रमाणपत्र, वनहक्क प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्रे तसेच जमीन व घर वाटप प्रमाणपत्रांच्या पडताळणीचे काम सोपविण्यात आले आहे. प्रकल्प बालविकास अधिकारी नितीन मोहले यांच्याकडे कौटुंबिक नोंदवहीची, तर जिल्हा दुय्यम निबंधक अनिल कपले यांच्याकडे विवाह नोंदणी प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

विहित मुदतीत अहवाल सादर करण्याचे निर्देश

नोडल अधिकाऱ्यांनी संबंधित विभागांकडून कागदपत्रांची सत्यता पडताळून अचूक अहवाल विहित कालमर्यादेत जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना सादर करावयाचा आहे. त्यानंतर जिल्हा निवडणूक अधिकारी आपले अभिप्राय नोंदवून अहवाल ERO/AERO यांच्याकडे पाठवतील. या अहवालांच्या आधारे मतदार नोंदणी अधिकारी सुनावणीचा अंतिम निर्णय नियमानुसार व गुणवत्तेच्या आधारावर घेणार आहेत.

कागदपत्र पडताळणीचे काम जलद गतीने पूर्ण होण्यासाठी जिल्हास्तरीय नोडल अधिकाऱ्यांनी प्राप्त कागदपत्रे संबंधित विभागांकडे पाठवून अहवाल वेळेत प्राप्त करून घ्यावेत. हे अहवाल उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर करावेत, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

प्रशिक्षण व शिस्तीचे निर्देश

सदर कार्यक्रमांतर्गत संबंधित अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार असून, त्याची तारीख, वेळ व ठिकाण स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे. नियुक्त समितीने उपजिल्हा निवडणूक अधिकारी, भंडारा यांच्या मार्गदर्शनाखाली SIR संदर्भातील कामकाज काटेकोरपणे पार पाडावे. कामात निष्काळजीपणा आढळल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० मधील कलम ३२ नुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आदेशात देण्यात आला आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.