नागपूर २१ : नंदनवन परिसरात एका किरकोळ वादाने हिंसक वळण घेतले. शिवीगाळ रोखण्याचा प्रयत्न करताच चार तरुणांनी एका युवकाच्या डोक्यावर दगडाने हल्ला केला, ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. नंदनवन पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी युवकाचे नाव अनिकेत विलास सोंडावले (25) असून तो बुधवारी सकाळी आपल्या मित्र आकाश चौधरी आणि राजेश नाईक यांच्यासोबत केडीके कॉलेज रोडवरील एका मोकळ्या मैदानात नाश्ता करत होता. त्याचवेळी शुभम जगदीश लाडेकर (25), रोशन सारंगपुरे (26), चेतन गायकवाड (27) आणि योगेश झाडे (24) हे चार तरुण दारू पित त्या परिसरात जमले होते. त्यांनी अनिकेत आणि त्याच्या मित्रांना उद्देशून “येथे जुगार खेळण्यासाठी बसला आहात का?” असा टोमणा मारला.अनिकेतने स्पष्ट केले की ते केवळ नाश्ता करत आहेत, मात्र आरोपींनी त्यानंतर शिवीगाळ सुरू केली. अनिकेतने त्यांना शिवीगाळ थांबवण्यास सांगितले असता, आरोपी शुभम लाडेकरने रस्त्यावर पडलेला मोठा दगड उचलून अनिकेतच्या डोक्यावर जोरात प्रहार केला. या हल्ल्यात अनिकेत गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नंदनवन पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध मारहाणीचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणामुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले आहे.
Home Latest News टोमणे मारल्यावरून वाद; नाश्ता करणाऱ्या युवकावर दगडाने हल्ला, चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल



