spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

असमानी आणि सुलतानी संकट

नुकत्याच झालेल्या आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांनी पंढरपूर ला जाऊन माऊली विठ्ठलाकडे साकडं घातलं की राज्यात भरपूर पाऊस पडू दे, शेती पिकू देत. देवाने यातली एक गोष्ट जास्तच मनावर घेतली अन दुसरीवर दुर्लक्ष केलंय असं वाटायला लागतं! या वर्षीच्या सतत व अतिवृष्टीने महाराष्ट्रातील अंदाजे २५ ते ३० लाख शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले. याचा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होणार आहे. जवळपास २४ लाख हेक्टर शेतीतील पिके नष्ट झालीत आणि सुपीक जमीन खरडल्याने अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांचे हाल शब्दात व्यक्त करता येणार नाही. यात भर म्हणून की काय पंचनामे वेळेवर नाहीत, पंचनाम्यात भेदभाव, काही ठिकाणी अधिकाऱ्यांची अरेरावी, मंत्र्यांचे बडेबोल, कसलं शासन सुरु आहे? कहर म्हणजे नुकसान भरपाईचे क्लिष्ट निकष, तुटपुंजी भरपाई तेही केव्हा मिळेल याची शाश्वती नाही. असमानी आणि सुलतानी संकटाने शेताकऱ्यांची पुरती वाट लागली आहे. शेवटी नैसर्गिक आपत्ती सांगून येत नाही हे खरे असले तरी वैज्ञानिक प्रगतीच्या युगात आपल्याला संकटाचा व नुकसानीचा योग्य अंदाज बांधता येऊ नये, सावधानतेचा इशारा देता येऊ नये ह्याचं आश्चर्य वाटते. अनेक कारणापैकी नदी – डोंगरावर केलेलं अतिक्रमण, पर्यावरणाचा ऱ्हास या बाबी सुद्धा आपत्तीचं एक कारण आहे की जे सर्व स्तरांवर दुर्लक्षित आहे. अलीकडे शासनाने ज्या प्रकारे राज्य गीत, राज्य महोत्सव जाहीर केले निधी दिला त्याचप्रकारे अतिवृष्टीला यावर्षीचं राज्य संकट घोषित करून प्रखर उपाययोजना कराव्यात.

शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा देण्यासाठी खालील उपाय करावेत. १. दिवाळी नंतर होऊ घातलेल्या सार्वजनिक निवडणुका पुढे ढकलाव्यात २. अनावश्यक जाहिराती बंद कराव्यात ३. तीर्थक्षेत्र आणि कुंभमेळा सारख्या धार्मिक बाबींसाठी जाहीर निधित कपात करावी ४. सर्व आमदार, खासदारांचे अतिरिक्त खर्च, भत्ते बंद करावेत व यांनी स्वखर्चाने दौरे करावे ५. शासकीय कर्मचाऱ्यांचे तीन दिवसाचे वेतन आपत्ती निधित जमा करावेत ६. पात्र लाडक्या बहिणीन्नाच लाभ द्यावा ७. आपत्ती ग्रस्त विद्यार्थ्यांना सर्व फी माफ करावी ८. भविष्यात नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी आधुनिक यंत्रणा उभारावी ९. शेतपिकांसाठी हमीभावाची काटेकोर अंमलबजावणी करावी व सवलती मधे सरकारी धान्य कोठारे उभारावी १०. ग्रस्त लोकांना अन्न आणि आरोग्याच्या मोफत सोयी कराव्यात ११. पीक विमा निपटारे ताबडतोब करावेत आणि सर्वात महत्वाचं १२. तात्काळ कर्जमाफी जाहीर करावी इत्यादी.

शेतकऱ्याची अवस्था काय सांगावी..?

अंकुरित होते बीज जेव्हा, वरूणराज गुप्त झाले

कापणीला उभं शेत कधी, अतिवृष्टिनं नष्ट केले

वेदनेला कसे हुंदके आले,दुःख सार्वत्रिक झाले

झोळी रितीच आयुष्याची, विष – गळफास आप्त झाले

यात्रा निघाली अंतिम तेव्हा, कर्जाचे ओझे माफ केले

नियतीला क्रुर हसू आले,दुःखाचे नाव बळीराजा झाले

– प्रा. विलास डोईफोडे,सावनेर


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.