सचिन चौरसिया, प्रतिनिधी रामटेक :- विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक असलेल्या रामटेक येथील प्रसिद्ध अठराभुजा गणेश मंदिरात तिल चतुर्थीच्या पावन पर्वावर भव्य धार्मिक आयोजन संपन्न झाले. हैदराबाद येथून आलेल्या ७० पंडितांनी भगवान श्रीगणेशाचा अथर्वशीर्ष सहस्त्र अभिषेक करण्यात आला. गजानन ग्रुप, हैदराबाद (मंथनी) यांच्या वतीने या अभिषेकाचे आयोजन करण्यात आले होते. एकाच वेळी १००० अथर्वशीर्ष पठणासह अभिषेक करण्यात आल्याने मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. गजानन ग्रुपच्या वतीने विनोदकुमार महावारी, प्रभाकर मारकपवार, सुरेश रेवतकर, अशोक रामपल्ली व विवेक खर्डणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. मागील तीन वर्षांत गजानन ग्रुपने तेलंगणा, आंध्रप्रदेश, महाराष्ट्रासह देशभरातील १०९ गणेश मंदिरांत सहस्त्र अभिषेकाचे आयोजन केले असून रामटेक येथील हा १०९ वा अभिषेक ठरला. अभिषेकापूर्वी पंडित व भाविकांनी रामटेक येथील प्राचीन राममंदिरात दर्शन घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंदिर समितीचे हुकुमचंद बडवाईक, राजवामन राव, राजेंद्र राव, रत्नप्रकाश, सज्जा श्रीनिवास, गौरव दिवटेलवार व विनाराणी यांच्यासह अनेक भाविकांनी सहकार्य केले.








