– खराशी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ; ज्वेलरी दुकान आणि दोन कृषी केंद्रांतून ७४ हजारांचा ऐवज लंपास
हंसराज प्रतिनिधी भंडारा पालांदूर :- पालांदूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजा खराशी व लोहारा परिसरात अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत एका ज्वेलरी दुकानाससह दोन कृषी केंद्रांवर डल्ला मारला. या धाडसी चोरीत चोरट्यांनी एकूण ७४,००० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला असून, परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजेंद्र उर्फ राजू सुधाकर रोकडे (४२, रा. पालांदूर) यांचे खराशी येथे ‘लक्ष्मी ज्वेलरी’ नावाचे दुकान आहे. ३ जानेवारी रोजी सायंकाळी दुकान बंद करून ते घरी गेले असता, रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर वाकवून आत प्रवेश केला. चोरट्यांनी केवळ लक्ष्मी ज्वेलरीच नव्हे, तर शेजारील सुभेदार ॲग्रो एजन्सी आणि देशमुख कृषी केंद्राचेही शटर तोडून आत प्रवेश केला.
• लक्ष्मी ज्वेलरी: सुमारे २०० ग्रॅम चांदीचे दागिने (अंगठ्या, हाताचे कडे, पायल, रिंग, जोडवे) – किंमत अंदाजे ६०,००० रुपये.
• सुभेदार ॲग्रो एजन्सी: १२,००० रुपये रोख रक्कम.
• देशमुख कृषी केंद्र: २,००० रुपये रोख रक्कम.
असा एकूण ७४,००० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळवून नेला.
या घटनेची माहिती कुणाल झलके यांनी फिर्यादीला फोनवरून दिली. घटनास्थळी पोहोचल्यावर रोकडे यांनी पालांदूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध अप. क्र. ०३/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३१ (४) व ३०५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
घटनेचा पुढील तपास ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गिरीवर पेंदोर हे करीत आहेत. वाढत्या चोऱ्यांच्या सत्रामुळे व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण असून, पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.




