spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

अर्थसंकल्पातून बळीराजाची शुद्ध फसवणूक!

हंसराज,प्रतिनिधी भंडारा :-“महायुती सरकारने आज मांडलेला अर्थसंकल्प म्हणजे केवळ शब्दांचा बुडबुडा आणि आकड्यांचा खेळ आहे. भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी मोठ्या आशेने सरसकट कर्जमाफीची वाट पाहत होता, मात्र सरकारने केवळ २ लाखांची मर्यादा घालून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे,” अशी घणाघाती टीका माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष (NCPSP), भंडारा यांनी केली आहे. सातबारा कोरा कोरा कोरा असे तीन वेळा म्हणविणारे आज स्वतः घोषणा करताना मात्र स्वतःचे शब्द विसरले, साधारण आणि निवडक कर्ज माफ केल्याने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार नाही हे तितकेच स्पष्ट आहे.

भंडारा जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आक्षेप:

धान उत्पादकांकडे दुर्लक्ष: जिल्ह्याचा मुख्य कणा असलेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी बोनसची कोणतीही ठोस घोषणा नाही. “धानाला किमान ३००० रुपये भाव आणि ५०० रुपये बोनस” ही आमची मागणी सरकारने केराची टोपली दाखवून फेटाळली आहे.

सरसकट कर्जमाफीचा अभाव: जिल्ह्यात कर्जाचा डोंगर असलेल्या ७०% शेतकऱ्यांचे कर्ज २ लाखांच्या वर आहे. मग या ‘तुकड्या-तुकड्यांतील’ कर्जमाफीचा फायदा कोणाला? हा केवळ निवडणूक जुमला आहे.

बेरोजगारीचा प्रश्न: भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील सुशिक्षित तरुणांसाठी नवीन उद्योग किंवा रोजगाराच्या संधींबाबत अर्थसंकल्प पूर्णपणे मौन आहे. भेल (BHEL) सारख्या प्रकल्पांचे काय झाले? याचे उत्तर सरकारने द्यावे.

सिंचन प्रकल्पांचा निधी: गोसेखुर्द सारख्या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील उपसा सिंचन योजनांसाठी भरीव निधीची तरतूद न केल्याने शेतकरी पुन्हा पावसाच्या भरवशावर राहिला आहे.

“हा अर्थसंकल्प म्हणजे ‘गाजर दाखवण्याचा’ प्रकार आहे. ज्यांनी शेती पिकवली त्यांना कर्जमाफी नाही आणि ज्यांनी नियमित कर्ज भरले त्यांना प्रोत्साहन नाही. या अन्यायाविरोधात NCPSP भंडारा जिल्ह्याच्या वतीने लवकरच रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.”

— चरण वाघमारे – जिल्हाध्यक्ष (NCPSP) भंडारा


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.