spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

बांगलादेशी वणवा

बांगलादेशातील वणवा आणि तेथे निर्माण झालेली अराजकसदृश स्थिती चिंताजनक आहे. अलीकडच्या काळातील एक मोठे राजनैतिक आव्हान त्यामुळे भारतापुढे तयार झाले असून, त्यातील पेच गुंतागुंतीचा असल्याने त्यावर सरळसोट असा तोडगा नाही. बांगलादेशाबरोबरची मैत्री टिकवायची, पण त्याचवेळी महम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील काळजीवाहू सरकारच्या ‘छत्रछाये’खाली धुमाकूळ घालणाऱ्या भारतविरोधी शक्तींचा बंदोबस्त करायचा, ही एकप्रकारे तारेवरची कसरत आहे. त्यातही काळजीची बाब म्हणजे बांगलादेशात इस्लामिक पुनरुज्जीवनवादी गटांच्या कारवायांना ऊत आला आहे.

बांगलादेशातील भूमी आता त्यांना भुसभुशीत वाटू लागली असून भारतविरोधी राजकारण करू पाहणारे त्यांचा वापर राजकीय हितसंबंधांसाठी करीत आहेत. अशाप्रकारे भस्मासुर वाढू देण्यातील धोके किती भीषण असतात, हे इतिहासाने अनेकदा दाखवून दिले असूनही त्यापासून काही शिकायचेच नाही, असा बांगलादेशातील सध्याच्या राज्यकर्त्यांनी पण केलेला असावा. हे ‘काळजीवाहूपण’ म्हणायचे की ‘आगलावेपणा’ असा प्रश्न निर्माण होतो. कोणत्याही देशाच्या राज्यकर्त्यांची प्रवृत्ती असते की, अंतर्गत आघाडीवर अपयश आले की त्याचे खापर कोणत्यातरी बाह्य घटकावर फोडायचे.

युनूस आणि त्यांच्या सरकारने सगळ्या समस्यांसंदर्भात भारताकडे बोट दाखवण्याचा उपद्‍व्याप सुरू केला आहे. त्यातच बांगलादेशातील शेख हसीना सरकारविरोधात झालेल्या विद्यार्थी आंदोलनाचा नेता हैदी याची हत्या झाली. यामागे भारताचेच कारस्थान असल्याचा आरोप करण्यात येत आहे, परिणामतः बांगलादेशातील भारतद्वेषाच्या आगीत तेल ओतू पाहणाऱ्यांचे फावले आहे. बांगलादेशाच्या तत्कालिन पंतप्रधान शेख हसीना यांना आश्रय दिल्याने आधीच तेथे असंतोष आहे. तो आता आणखीनच भडकला असून एका हिंदू तरुणाची अत्यंत निर्घृण हत्या बांगलादेशात झाली.

या परिस्थितीत या हिंसाचाराला आळा घालण्यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच या देशाबरोबरची पूर्वापार चालत आलेली मैत्री टिकवण्यासाठीदेखील पावले टाकावी लागतील. त्यात भारतीय मुत्सद्देगिरीचा कस लागणार आहे. सद्यःपरिस्थितीचा फायदा उठवण्यासाठी पाकिस्तान टपूनच बसलेला आहे. त्यांचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी बांगलादेशातील भारताविषयीचे सौहार्द टिकविणे आवश्यक आहे. त्यामुळेच कितीही भडकावण्याचा प्रयत्न झाला तरी भारताला संयमाने परिस्थिती हाताळावी लागेल. सुदैवाने परराष्ट्रखात्याचे प्रयत्न त्याच दिशेने सुरू आहेत. बांगलादेशाच्या नवी दिल्लीतील उच्चायुक्त कार्यालयातील व्हिसा आणि दूतावासातील अन्य सेवा अपरिहार्य कारणामुळे स्थगित करण्याचे पाऊल बांगलादेश सरकारने उचलले आहे. याउलट सुरक्षेला धोका असूनही सिल्हेट, राजशाही, खुलना येथील व्हिसा केंद्रे मानवतावादी भूमिकेतून भारताने सुरू ठेवली. विशेषतः वैद्यकीय कारणासाठीच्या व्हिसाबाबत.

राजकीय पातळीवर दोन्ही देशात तणाव निर्माण झाला असला तरी उभयपक्षी संबंध विविध क्षेत्रांत आहेत. सध्या त्या देशात सुमारे १९ हजार भारतीय वास्तव्यास आहेत. त्यात प्रामुख्याने नऊ हजार विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रांतील व्यावसायिक, तज्ज्ञ कर्मचारी, उद्योग–व्यापाराशी संबंधित व्यक्ती, स्वयंसेवी संस्था व आंतरराष्ट्रीय संस्थांमधील कुशल नोकऱ्यांमध्ये कार्यरत लोकांचा समावेश आहे. भारत–बांगलादेश आर्थिक संबंध अत्यंत मजबूत आहेत. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये दोन्ही देशांमधील एकूण व्यापार सुमारे १३.५ अब्ज अमेरिकी डॉलर इतका होता. भारत त्या देशाला इंधन, पेट्रोलियम उत्पादने, कापूस, कापड, रसायने, यंत्रसामग्री आणि औद्योगिक वस्तू मोठ्या प्रमाणावर निर्यात करतो, तर बांगलादेशकडून भारत प्रामुख्याने तयार कपडे, ज्यूट व ज्यूटउत्पादने आयात करतो. या व्यापारात भारताला सुमारे ९.४ अब्ज डॉलरचा फायदा होतो.

ईशान्येतील राज्यांसाठी दळणवळणाचा महत्त्वाचा मार्ग असलेला बांगलादेश भारतासाठी भौगोलिक, सामरिक आणि आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. तसेच दोन्ही देशांमध्ये ऐतिहासिक, सांस्कृतिक नाते आहे. प्रादेशिक शांतता व स्थैर्य यादृष्टीने भारत महत्त्वाचा शेजारी देश आहे. त्या देशाशी मैत्री पाकिस्तानला खुपते. चीनही तेथे शिरकाव करीत आहे. अशा परिस्थितीत भारताला बांगलादेशातील आपला प्रभाव टिकवावा लागेल. तेथे होणाऱ्या निवडणुकीनंतर लोकशाही प्रक्रिया पूर्ववत झाली, तर त्या देशाच्या हिताचे आहेच, परंतु भारतालाही त्यातच स्वारस्य आहे. बांगलादेशातील हिंदू समाजाच्या सुरक्षेसाठी त्या देशाच्या सरकारवर दबाव टाकणे आवश्यक आहे, यात शंका नाही.

परंतु हे करीत असताना काही पथ्ये पाळावी लागतील. बांगलादेशातील घटनांचा इथल्या निवडणुकांतील प्रचारासाठी वापर करणे टाळले पाहिजे. तेथील हिंसाचाराच्या व अन्य घटनांबाबत धसमुसळ्या प्रतिक्रिया व्यक्त करण्याने देशाच्या हितालाच बाधा पोचते, हे भान ठेवायला हवे. मुख्य म्हणजे कुठल्याही चिथावणीला बळी न पडता परिस्थितीची हाताळणी मुत्सद्देगिरीने करावी लागेल. जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण… हे विसरता येणार नाही.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.