नागपूर :- खासदार झाले म्हणून पक्षाचे ‘मालक’ ठरत नाहीत. संयमाने आणि सर्वांना सोबत घेऊन काम करावे लागते. वैचारिक मतभेद असू शकतात; मात्र त्यावरून कार्यकर्त्यांना डावलणे किंवा तिकीट कापणे योग्य नाही, अशा शब्दांत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. जुना इतिहास काढायचा ठरला, तर बाळू धानोरकर यांना काँग्रेसमध्ये आणण्यापासून ते प्रतिभा धानोरकर यांच्या प्रवेशापर्यंतचा सगळा प्रवास माझ्यासमोरच झाला, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ते पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, “खासदार आणि नेते यांचे काम वेगवेगळे असते. खासदार झाल्याने कुणी पक्षाचा मालक होत नाही. पक्ष कार्यकर्त्यांचा असतो. प्रतिभा धानोरकर यांचे वक्तव्य गैरसमजातून झाले असावे. त्यांनी संयम ठेवून बोलावे. त्यांचे राजकीय भविष्य मोठे आहे.” आमच्यात कुठलाही वाद नाही, असा दावाही त्यांनी केला.
गेल्या २५ वर्षांपासून जिल्ह्याची जबाबदारी आपण सांभाळत असल्याचे सांगत वडेट्टीवार म्हणाले की, “प्रतिभा धानोरकर सहा वर्षांपूर्वी पक्षात आल्या. जुने काँग्रेस कार्यकर्ते ज्यांनी पक्ष उभा ठेवला, त्यांनाच बाजूला सारले तर पक्ष कसा वाढेल? नगरपरिषद निवडणुकीत कार्यकर्त्यांनी जीव ओतून काम केले; त्यावेळी खासदारांचा सहभाग नव्हता.” महानगरपालिका निवडणुकीत दोघांच्या सहमतीने ६० जागांवर उमेदवारी ठरल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, वसंत पुरके यांच्या आग्रहामुळे सहा जागांवर उमेदवारी बदलण्यात आली आणि त्यापैकी केवळ दोन उमेदवार निवडून आल्याने पक्षाचे नुकसान झाल्याचा आरोप त्यांनी केला. नगरसेवकांना जबरदस्तीने कुणाच्या घरी नेण्यात आले, अशा तक्रारी आपल्याकडे आल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. “दोन-चार नगरसेवक वगळता बहुतेक सर्व माझ्याकडे येतील. स्वतःहून नगरसेवक आमच्याकडे आले आहेत. कुणालाही कोणाच्या दारात बोलावलेले नाही,” असे ते म्हणाले. हायकमांडने प्रत्यक्ष नगरसेवकांशी चर्चा करावी, म्हणजे गैरसमज दूर होतील, असेही त्यांनी नमूद केले.
चंद्रपूरचा महापौर सर्व नगरसेवकांच्या सहमतीने ठरवला जाईल, असे सांगत वडेट्टीवार म्हणाले, “पक्ष सोडून जाण्याच्या अफवा चुकीच्या आहेत. कार्यकर्ता जिवंत असेल तरच पक्ष जिवंत राहतो.” नेते पक्षाचे मालक नसून कार्यकर्तेच खरे मालक असल्याचे ठामपणे सांगत, “कोणी स्वतःला मालक समजत असेल तर कार्यकर्त्यांनी त्याला योग्य जागा दाखवावी,” असा सूचक इशाराही त्यांनी दिला.