Wednesday, March 25, 2026
spot_imgspot_img
spot_img

सावधान! पेट्रोल-डिझेलची टंचाई नाही; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पेट्रोल पंप चालकांचे आवाहन

भंडारा :- शहरात काल सायंकाळपासून ‘पेट्रोल आणि डिझेलचा साठा संपणार असून इंधन मिळणार नाही’, अशी अफवा वाऱ्यासारखी पसरली. या अफवेमुळे भंडारकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, काल रात्रीपासूनच शहरातील विविध पेट्रोल पंपांवर नागरिकांनी इंधन भरण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र संपूर्ण शहरात पाहायला मिळत आहे.

अचानक वाढलेल्या गर्दीमुळे शहरातील मुख्य रस्त्यांवरील वाहतूकही काही ठिकाणी मंदावली होती. भीतीपोटी अनेक नागरिक आपल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या टाक्या ‘फुल’ करून घेताना दिसत आहेत. रांगा इतक्या लांब होत्या की, इंधन मिळवण्यासाठी नागरिकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागली. यामुळे पंप परिसरात प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता.

या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल पंप चालकांनी परिस्थिती स्पष्ट केली आहे. “शहरात किंवा जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलची कोणतीही टंचाई नाही. इंधनाचा पुरवठा नियमितपणे सुरू आहे. नागरिकांनी केवळ अफवांवर विश्वास ठेवून गर्दी करू नये,” असे आवाहन पेट्रोल पंप असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे. इंधनाचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

पेट्रोल पंपाबाहेर लागलेल्या वाहनांच्या रांगा थेट मुख्य रस्त्यापर्यंत आल्याने शहरात काही ठिकाणी वाहतुकीची कोंडी पाहायला मिळाली. यामुळे सर्वसामान्यांना प्रवासात अडचणी येत आहेत. नागरिकांनी कोणत्याही अधिकृत माहितीशिवाय अशा अफवांना बळी पडू नये आणि संयम बाळगावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com