गडचिरोली २० : जिल्ह्यात काल संध्याकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भामरागड शहराने बेटाचे स्वरूप धारण केले असून, अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत. शहरातील ३० ते ४० घरांमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांना इतरत्र स्थलांतर करावे लागले आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, रस्ते जलमय झाल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे. भामरागड तालुक्यातील कोडपे गावातील १९ वर्षीय लालचंद कपिलसाय लकडा हा युवक १८ ऑगस्ट रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास खंडी नाला ओलांडताना वाहून गेला. दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह नाल्याजवळ सापडला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
१७२ मिमी पावसाची नोंद
गडचिरोली शहरात सर्वाधिक १७२ मिमी पावसाची नोंद झाली असून, पावसाचा जोर आजही कायम आहे. जिल्ह्यातील प्रमुख नद्या व नाले तुडुंब भरून वाहत आहेत. पर्लकोटा, वटरा, पोहार, गोमणी आदी नाल्यांमध्ये पाण्याची पातळी वाढल्याने अनेक रस्ते जलमय झाले आहेत.
१२ प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद
पावसामुळे जिल्ह्यातील एकूण १२ प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. यामध्ये पुढील मार्गांचा समावेश आहे:
हेमलकसा-भामरागड राष्ट्रीय महामार्ग १३० डी (पर्लकोटा नदी), अहेरी-वटरा रस्ता, राज्य महामार्ग ३७० (वटरा नाला), तळोधी-आमगाव-महाल-विसापूर राज्य महामार्ग ३८१ (पोहार नदी), आष्टी-कोपरअली रस्ता (राज्य महामार्ग ३७८), मुलचेरा-गोमणी रस्ता (राज्य महामार्ग ३७०), चौडमपल्ली-चपराळा रस्ता (प्रजिमा ५३), काढोली-उराडी रस्ता (प्रजिमा ७), शंकरपूर-डोंगरगाव रस्ता (प्रजिमा १), कोकडी-तुलशी रस्ता (प्रजिमा ४९).
प्रशासन सतर्क; मदतकार्य सुरू
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. नद्या व नाल्यांच्या काठावर राहणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन पथक, महसूल आणि पोलीस प्रशासन परिस्थितीवर निरंतर लक्ष ठेवून आहेत. मदतकार्य सुरू असून, नागरिकांना आवश्यक ती मदत दिली जात आहे.
संपर्क तुटलेला भामरागड
पूरस्थितीमुळे भामरागड शहराचा जिल्ह्याशी संपर्क तुटला आहे. शहरात पाणी शिरल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.




