– ० ते ४० वयोगटातील नागरिकांच्या तपासणीवर भर; जिल्हाधिकारी सावन कुमार यांचे आवाहन
हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- भंडारा जिल्ह्यात सिकलसेल ॲनिमिया या अनुवांशिक आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आणि जनसामान्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियान’ प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. ग्रामीण आणि दुर्गम आदिवासी भागातील नागरिकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देत हे अभियान राबवले जात असून, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
सिकलसेल ॲनिमिया हा एक अनुवांशिक आजार असून, वेळेत निदान व उपचार झाल्यास त्याचे संभाव्य धोके टाळता येतात. याच उद्देशाने जिल्ह्यात या अभियानांतर्गत व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत प्रामुख्याने शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, गर्भवती महिला तसेच ० ते ४० वयोगटातील सर्व नागरिकांची सिकलसेल तपासणी करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे आणि गावपातळीवर विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी नागरिकांना मोफत तपासणी, तज्ज्ञांकडून समुपदेशन आणि आवश्यक औषधोपचारांची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. केवळ तपासणीच नव्हे, तर आजाराची लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवली जात आहे.
आशा वर्कर व अंगणवाडी सेविकांचा पुढाकार
हे अभियान यशस्वी करण्यासाठी आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांचे मोठे योगदान लाभत आहे. हे कर्मचारी घरोघरी जाऊन नागरिकांचे समुपदेशन करत आहेत. सिकलसेलबाबत मनात असलेली भीती दूर करून जास्तीत जास्त नागरिकांनी तपासणी करून घ्यावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
भंडारा जिल्ह्याला सिकलसेलमुक्त करण्याच्या दिशेने ‘अरुणोदय अभियान’ हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी जिल्हयातील नागरिकांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. “नागरिकांनी स्वतःहून पुढे येऊन आपली व आपल्या मुलांची तपासणी करून घ्यावी. वेळेवर निदान आणि उपचार हाच या आजारावर मात करण्याचा प्रभावी मार्ग आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या अभियानामुळे जिल्ह्यातील सिकलसेल रुग्णांचा शोध घेऊन त्यांना योग्य उपचार देणे सुलभ होणार असून, आरोग्य विभागाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.