हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- शहरातील न्यू बौद्ध वार्ड, बेला परिसरात १ जानेवारी रोजी दुपारी भरदिवसा चोरीची एक धाडसी घटना घडली आहे. एका एसटी कंडक्टरच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ६१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सतीश काशीनाथ शेंडे (वय ४८), व्यवसाय एसटी कंडक्टर, रा. न्यू बौद्ध वार्ड, बेला हे आपल्या पत्नीसह १ जानेवारी रोजी दुपारी १:०० ते ४:०० च्या दरम्यान घराला कुलूप लावून ऑफिसच्या कामासाठी भंडारा येथे गेले होते. घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला.
दुपारी ४:०० वाजेच्या सुमारास त्यांच्या शेजारी राहणाऱ्या वर्षा राऊत यांनी शेंडे यांना फोन करून घराची कडी उघडी असून घरातील सामान अस्ताव्यस्त पडल्याची माहिती दिली. शेंडे दाम्पत्याने तातडीने घरी येऊन पाहिले असता, बेडरुममधील लोखंडी आलमारीचे लॉकर तुटलेले दिसले.
चोरीला गेलेला माल:
चोरट्यांनी आलमारीतून १० ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र (किंमत ५०,००० रु.), ५ ग्रॅमच्या ३ सोन्याच्या अंगठ्या (किंमत ७५,००० रु.), ५ ग्रॅमचे सोन्याचे कानातील टॉप्स (किंमत २५,००० रु.), १० ग्रॅमचा चांदीचा कडा (किंमत २,००० रु.) आणि ९,५०० रुपयांची रोख रक्कम असा एकूण १,६१,५०० रुपयांचा ऐवज लंपास केला.
सतीश शेंडे यांच्या तक्रारीवरून भंडारा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३३१(३) अन्वये गुन्हा (अप. क्र. १९/२०२६) नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घनश्याम नवखरे करीत आहेत. भरदिवसा झालेल्या या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.