हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- विद्यानगर परिसरात वृत्तपत्र विक्रेत्याला चिरडून पसार झालेल्या ‘हिट अँड रन’ प्रकरणाचा छडा लावण्यात भंडारा पोलिसांना अवघ्या ४८ तासांत यश आले आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि नाकाबंदी ॲपच्या मदतीने पोलिसांनी आरोपी चालकाला शोधून काढले असून, गुन्ह्यात वापरलेला आयशर ट्रक जप्त केला आहे. आकाश एकनाथ मोटघरे (रा. नेहरू वार्ड, मोहाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास शंकर भोजलाल पटले (४५, रा. ओमनगर, गोंड टोली, कोकरला) हे आपल्या मोपेड गाडीने (MH 36 AS 2470) वृत्तपत्र वाटप करण्यासाठी शहरात गेले होते. काम आटोपून परत येत असताना चोले हॉस्पिटलजवळ नागपूरकडून येणाऱ्या एका अज्ञात ट्रकने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात शंकर पटले यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला होता. याप्रकरणी मृत शंकर यांच्या पत्नी ईशा पटले यांनी भंडारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश गोरे आणि ठाणेदार उल्हास भुसारी यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने तपास सुरू केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश खंदाडे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळावरील व परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. यामध्ये एक कथ्या रंगाचा आयशर ट्रक (क्रमांक MH 36 F 4851) संशयास्पद रितीने जाताना दिसला.
मिळालेल्या ट्रक क्रमांकाची ‘नाकाबंदी ॲप’वरून माहिती काढली असता, सदर ट्रक मोहाडी येथील आकाश मोटघरे याच्या मालकीचा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तात्काळ मोहाडी येथे धाव घेऊन आरोपीला आणि अपघातग्रस्त ट्रकला ताब्यात घेतले.
ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांच्या नेतृत्वात सपोनि राजेश खंदाडे, सफौ तुळशीदास मोहरकर, पोलीस शिपाई अमोल मस्के, शेषराव राठोड, कोमल ईश्वरकर आणि भंडारा पोलीस पथकाने केली आहे. याप्रकरणी आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८१, १०६ (१) आणि मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय पंचबुधे करत आहेत.