सचिन चौरसिया, प्रतिनिधी रामटेक :- रानडुकराने धडक दिल्यानंतर दुचाकीला झालेल्या अपघातात मंगेश छन्नीलाल नागपुरे (वय ३७) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील नगरधन-आजनी रोडवरील लहान कालव्याजवळील वळणावर येथे घडली. माहितीनुसार मंगेश नागपुरे (वय ३७) हा शेती व्यवसाय सोबत नगरधन येथे सूर्य लक्ष्मी कॉटन मिल्स मध्ये कार्यरत होता. कंपनीत आयोजित क्रिकेट स्पर्धेसाठी तो आपल्या दुचाकी क्रमांक एमएच ४०, एव्ही ८७९६ ने सामना संपवून घरी परत येत असताना नगरधन-आजनी रोडवरील लहान कालव्याजवळ रानडुकरांच्या कळप रस्त्यावर आला. एका रानडुकराने त्यांना धडक दिली. खाली पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला. यांच्या जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच रामटेक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे पाठवण्यात आले. पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली असून, मंगेश नागपुरे यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. अकस्मात मृत्यूने कुटुंबावर दुःखाच्या डोंगर कोसळला आहे.
नगरधन-आजनी रोडवर अनेक ठिकाणी तीव्र वळणे असूनही कोणतेही सूचना फलक, दिशादर्शक चिन्हे किंवा ‘अपघातप्रवण क्षेत्र’ दर्शवणारे बोर्ड लावण्यात आलेले नाहीत. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या घटनेनंतर तरी संबंधित यंत्रणांनी तातडीने सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.