हंसराज, प्रतिनिधी भंडारा तुमसर : तुमसर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून पैसे काढून घरी जाणाऱ्या एका ५९ वर्षीय महिलेच्या हातातील ५० हजार रुपये असलेली पिशवी दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी हिसकावून नेल्याची खळबळजनक घटना सोमवारी दुपारी घडली. याप्रकरणी तुमसर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिता आनंदराव चामट (वय ५९, रा. इंदिरानगर, तुमसर) या १२ जानेवारी रोजी दुपारी १२:२० वाजताच्या सुमारास स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा तुमसर येथे गेल्या होत्या. त्यांनी विड्रॉल स्लिपच्या माध्यमातून ५०,००० रुपये काढले. बँकेतच खुर्चीवर बसून पैसे मोजल्यानंतर त्यांनी ते पैसे ‘डुंभरे ज्वेलर्स’ असे नाव असलेल्या निळ्या रंगाच्या कापडी पिशवीत ठेवले.
पैसे घेऊन अनिता चामट या पायी आपल्या घराकडे निघाल्या असता, पाठीमागून एका विनाक्रमांक असलेल्या मोटरसायकलवर दोन अज्ञात इसम आले. त्यांनी संधी साधून अनिता यांच्या डाव्या हातातील पैशांची पिशवी जोराचा झटका देऊन हिसकावून नेली आणि वेगाने पसार झाले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे फिर्यादी महिला भयभीत झाली.
याप्रकरणी अनिता चामट यांनी तुमसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध अपराध क्र. २६/२०२६, कलम ३०४ (२) भारतीय न्याय संहिता (BNS) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. भरदिवसा घडलेल्या या लुटीच्या घटनेमुळे बँक परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सयाम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.