– नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचे सत्कार
– महिला शक्तीकरणाचा जागर
तिरोडा :- येथील तक्षशिला बुद्ध विहार समिती, खैरलांजी रोड, तिरोडा च्या वतीने भीमा कोरेगाव शौर्य दिवस व सामूहिक जयंती समारोह आयोजित करण्यात आले होते. यावेळी नुकत्याच संपन्न झालेल्या तिरोडा नगर परिषद च्या सार्वत्रिक निवडणुकीत निर्वाचित नवनियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवकांचे सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून समाज सेविका व प्रबोधनकार डॉ. सविता बेदरकर, तर सत्कार मूर्ती म्हणून नगर सेवक राजेश गुनेरिया, प्रभू असाटी, कादर मन्सूरी, नगर सेविका मंगला नितीन तिरपुडे, डॉ. मुकुंद संदीप मेश्राम, आशा शामराव भोंडेकर, ममता भोजराज धामेचा प्रामुख्याने उपस्थित होते.
सर्व प्रथम भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भीमा कोरेगाव येथील शूर योद्धे सरदार सिदनाक महार, राजमाता जिजाऊ, माई सावित्रीबाई फुले, मुक्ता साळवे, फातिमा शेख यांच्या प्रतिमेला माल्याअर्पण व बुद्ध वंदना करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, मुक्ता साळवे, फातिमा शेख यांच्या संयुक्तिक जयंती उत्सव समारोह प्रसंगी या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून समाज सेविका व प्रबोधनकार डॉ. सविता बेदरकर, यांनी सर्व स्त्री उद्धारक यांच्या जीवनावर प्रकाश टाकत त्यांनी केलेल्या अद्वितीय सामाजिक कार्याबद्दल सखोल अभ्यास पूर्ण मार्गदर्शन केले. यावेळी महिला शक्तीकरणाचा जागर करत त्यांनी सर्व महापुरुषांचे विचार आत्मसात करण्याचे आवाहन केले. यावेळी नवनियुक्त नगर सेविका मंगला नितीन तिरपुडे, डॉ. मुकुंद संदीप मेश्राम, यांनी आपले विचार मांडले.
तक्षशिला बुद्ध विहार समिती, तिरोडा च्यावतीने नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचे सत्कार करण्यात आले. यात प्रामुख्याने नगर सेवक आयु. राजेश गुनेरिया, प्रभू असाटी, कादर मन्सूरी, नगर सेविका मंगला नितीन तिरपुडे, डॉ. मुकुंद संदीप मेश्राम, आशा शामराव भोंडेकर, ममता भोजराज धामेचा यांचे पुष्पगुच्छ व स्मृती चिन्ह देऊन नागरी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय जांभूळकर यांनी केले. जांभूळकर यांनी आपल्या प्रास्ताविकात तक्षशिला बुद्ध विहार समिती, च्या रिक्त जागेवर परिसरातील विद्यार्थ्यांसाठी भरीव निधीची तरतूद करून सार्वजनिक वाचनालय व अभ्यास केंद्र तसेच समाज भवन निर्माण करून नवनियुक्त नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांनी सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन रमेश नांदगाये यांनी केले तर उपस्थितांचे व अतिथींचे आभार दिनेश कोटांगले यांनी मानले. कार्यक्रमा उपरांत अल्पोपहाराचे वितरण करण्यात आले.








