Tuesday, February 24, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

दारूबंदीच्या जिल्ह्यात मद्य कारखान्यावर ‘ब्रेक’

– वाढत्या जनआक्रोशापुढे प्रशासन नमले; सुनावणी स्थगित

गडचिरोली :- जिल्ह्यातील तीन दशकांची दारूबंदी आणि सामाजिक संघटनांचा तीव्र विरोध लक्षात घेता, ‘एलटीबी बिव्हरेजेस’ या प्रस्तावित मोहफूल मद्यनिर्मिती प्रकल्पाच्या जनसुनावणीला प्रशासनाने तूर्तास स्थगिती दिली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ९ मार्च रोजी आयोजित केलेली ही सुनावणी कायदा व सुव्यवस्थेचे कारण पुढे करत पुढील आदेशापर्यंत लांबणीवर टाकली आहे.

या निर्णयामुळे मद्यमुक्तीसाठी लढा देणाऱ्या संघटनांना तात्पुरता दिलासा मिळाला असला, तरी प्रकल्पाच्या भवितव्याबाबत टांगती तलवार कायम आहे.दोन वर्षांपासून थंडबस्त्यात असलेल्या या वादग्रस्त प्रकल्पासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने अचानक ९ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जनसुनावणी आयोजित केली होती. यासंदर्भात जाहीर नोटीस प्रसिद्ध होताच जिल्ह्यातून विरोधाचे सूर उमटू लागले होते.

जिल्ह्याची दारूबंदी आणि ‘मुक्तिपथ’सारख्या मोहिमांद्वारे सुरू असलेले व्यसनमुक्तीचे कार्य पाहता, हा प्रकल्प म्हणजे जिल्ह्याच्या सामाजिक आरोग्यावर घाला असल्याचे मत ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग आणि देवाजी तोफा यांनी व्यक्त होत होते. या संदर्भात त्यांनी प्रशासनाकडे लेखी आक्षेप नोंदवले होते. या विरोधाची दखल घेत प्रदूषण नियंत्रण मंडळाने आता जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून सुनावणी स्थगित करण्याची विनंती केली आहे. स्थानिक रहिवाशांनी या प्रकल्पावर घेतलेले तीव्र आक्षेप आणि त्यातून निर्माण होणारी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती विचारात घेऊन ही जनसुनावणी पुढे ढकलण्यात येत असल्याचे मंडळाने आपल्या पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com