नागपूर १५ :- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व आदिवासी विकास मंत्री यांच्या नावाने नागपुर विभागातील आदिवासी विकास विभागाच्या अप्पर आयुक्त आयुषी सिंह यांना आज बहुजन समाज पार्टीच्या वतीने एक निवेदन देण्यात आले. निवेदनात सुराबर्डी येथील गोंडवांना आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय व प्रशिक्षण केंद्र विना विलंब बांधणे, नागपूरचे संस्थापक गोंडराजे बक्त बुलंदशहा ऊईके यांच्या समाधी स्थळाचा विनाविलंब विकास करणे, नागपूर विभागातील 76 आदिवासी आश्रम शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व पाठ्यपुस्तके लगेच उपलब्ध करून देणे, इंग्रजी माध्यमातील नामांकित शाळेत पात्र असलेल्या 228 आदिवासी बालकांना प्रथम वर्गात विनाविलंब सामावून घेणे, चिमूर तालुक्याच्या जांभुळघाट येथील आदिवासी आश्रम शाळेतील विषबाधा प्रकरणातील आरोपींवर कार्यवाही करणे, नागपुरातील 13 आदिवासी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांची डीबीटी अंतर्गत वाढलेली शिष्यवृत्तीची रक्कम विनाविलंब त्यांच्या खात्यात जमा करणे, आदि मागण्या करण्यात आल्या.
शिष्टमंडळात बसपाचे आदिवासी नेते इंजि दादाराव उईके, प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, प्रदेश महासचिव पृथ्वीराज शेंडे, नागोराव जयकर, जिल्हा महासचिव चंद्रशेखर कांबळे, जिल्हा प्रभारी राजकुमार बोरकर, विद्यार्थि नेते प्रा नितेश कांबळे, रोहित इलपाची, उमेश मेश्राम, अंकित थूल, सुरेंद्र डोंगरे, राजेश नंदेश्वर, जनार्धन मेंढे, अविनाश गेडाम आदि प्रामुख्याने उपस्थित होते.
आदिवासी समाजाच्या अनेक वर्षाच्या मागणीनंतर 14 ऑक्टोंबर 2024 रोजी आदिवासी समाजासाठी सांस्कृतिक संग्रहालय व प्रशिक्षण केंद्र बांधण्या संदर्भात निर्णय घेण्यात आला त्यासाठी 132 कोटी निधीची मंजुरी मिळाली भक्त बुलंद शहा यांच्या समाधी स्थळाच्या सौंदर्यकरणासंदर्भात अनेकदा घोषणा झाल्या एनएमसी व एनआयटीने अमाऊंटही जाहीर केला परंतु कार्यवाही मात्र शून्य हा प्रश्न मुख्यमंत्र्यांशी संबंधित असल्याचे सांगितले गेले
नागपूर विभागातील 76 आश्रम शाळेतील एकाही विद्यार्थ्याला गणवेश मिळाले नसल्याचे त्यांनी मान्य करून त्याला तांत्रिक कारण जबाबदार असल्याचे सांगितले. उर्वरित विद्यार्थ्यांच्या पुस्तकाबाबत अहवाल मागून ती समस्या सोडवण्याचे वचन दिले.
नामांकित शाळेतील पहिल्या वर्गातील प्रवेशा संदर्भात पालकांच्या आग्रहास्तव पुनर्विचार सुरू असल्याचे सांगितले, जांभूळघाट येथील विषबाधा प्रकरणी लगेच कारवाई होईल असे आश्वासन दिले.
वस्तीगृहातील विद्यार्थ्यांच्या वाढीव निर्वाह भत्या संदर्भात डीबीटी नुसार कार्यवाही सुरू असून शासनाचा वित्तविभाग त्याची लवकरच तरतूद करणार असेही त्या म्हणाल्या.
परंतु विभागाच्या चालढकल धोरणामुळे आज नागपूरच्या तेरा आदिवासी वस्तीगृहातील शेकडो महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी (मुलामुलींनी) अक्षरश: आदिवासी विकास विभागाला दिवसभर संपूर्ण कब्जात घेतले होते. अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश बसपाचे मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी दिली.




