कन्हान :- घरमालक उत्तर प्रदेशात आपल्या घरी गेल्याचे बघुन अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह एकुण ९० हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या टेकाडी येथील तिवारी लेआउट मध्ये १९ ते २० तारखेच्या दरम्यान घडली. फिर्यादी सुनील कुमार रामग्रह धुरिया यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार फिर्यादी सुनीलकुमार धुरिया वय ३५ वर्ष हे तिवारी लेआउट टेकडी येथे राहत असुन ते आपल्या मूळ गावी उत्तर प्रदेशातील मेदणीपुर नारायण टोला तालुका जिल्हा महाराज गंज येथे आपल्या स्थानिक घराला लॉक मारून गेले होते. दरम्यान हॉल मध्ये फिश पॉट असल्याने हॉलच्या दाराची चाबी शेजारी दिवाकर गुप्ता यांच्याकडे देऊन ते निघुन गेले. (ता. १९) मे रोजी फिर्यादीची भाची हे तिवारी ले-आउट येथील घरात सायंकाळी आठ वाजता आली आणि तिने फिश पॉट मध्ये चारा टाकुन निघुन गेली. दुसऱ्या दिवशी म्हणजेच २० मे रोजी ती परत मासळयांना चारा टाकण्याकरिता सायंकाळी पाच वाजता आली परंतु तिला हॉलच्या दरवाजा उघडा दिसला आत मधिल सामान सर्व अस्त व्यस्त पडलं होतं. तिने दिवाकर गुप्ता यांना लगेच माहिती दिली. दिवाकर गुप्ता यांनी सुनीलकुमार धुरिया यांना लगेच फोन करून सर्व माहिती दिल्याने सुनीलकुमार यांनी त्यांना हॉलला कूलुप लावुन ठेवण्यास सांगितले. त्यानंतर फिर्यादी २५ तारखेला कूटुंबासह टेकडी येथे आले. त्यांनी कूलुप उघडुन घरात प्रवेश केला असता सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडुन होते. घरातील फर्निचरच्या कपाट व दिवाण मधिल सामान अस्ताव्यस्त पडले होते. कपाटा मध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने ज्यात पान चाली, झुमके, टॉप्स असा एकुण दहा ग्रॅम किंमत ७०,००० रूपयांचा मुद्देमाल व आजीच्या काळातील चांदीचे दागिने ज्यात पायल, चाबी छल्ला कडा व मांगटीका २०० ग्रॅम किंम त २०,००० रुपये असा एकुण मुद्देमाल ९० हजार रुपयांचे दागिने अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून लंपास केले.
फिर्यादी हे गोंडेगाव ग्राम पंचायतचे वर्तमान उपसरपंच असुन त्यांच्या वडिलांच्या मृत्यु झाल्याने मृत्युपत्रासह इतर कागदपत्रे घेण्यासाठी ते उत्तर प्रदेश ला गेले होते. फिर्यादी सुनील कुमार धुरिया यांच्या तोंडी तक्रारीवरून पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजयंती मांडवधरे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करित आरोपींचा शोध सुरू आहे.