– फळ पीक विमा मदतीचे १७ कोटी ९० लक्ष रुपये तत्काळ वाटप करण्या विमा कंपनीची टाळाटाळ !
– रुपेश वाळके यांचा हिवाळी अधिवेशनामध्ये आंदोलन करण्याचा इशारा !
मोर्शी :- अमरावती जिल्हा हा विक्रमी संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असून जिल्ह्यातील हजारो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी कोट्यावधी रुपयांचा विमा हप्ता भरून हवामानवर आधारित २०२४ – २०२५ वर्षामध्ये आंबिया बहार संत्रा फळ विमा योजनेमध्ये सहभाग नोंदविला मात्र विमा कालावधी संपून ७ महिन्यांचा कालावधी लोटला तरीही जिल्ह्यातील हजारो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना फळ पिक विम्याचे पैसे देण्यास युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी टाळाटाळ करीत असून २ दिवसामध्ये संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे त्यांच्या खात्यात जमा न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रुपेश वाळके यांनी थेट नागपूर येथील सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शासनाला दिला असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषीमंत्री दत्ता मामा भरणे व सत्ताधारी नेत्यांविरोधात अमरावती जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजनेचा परतावा शेतकऱ्यांच्या खात्यात व्याजासह जमा करणेबाबत बाबत मोर्शी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष वाळके यांच्या नेतृत्वात मोर्शी तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात ६ तास ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर सदर विमा कंपनीने अमरावती जिल्ह्यामध्ये आंबिया बहार हंगाम २०२४-२५ मध्ये विमा परताव्याची एकूण मंजूर झालेली १७ कोटी ९० लाख ३५ हजार ८६० रुपये रक्कम केंद्र शासनाच्या NCIP (पिक विमा) पोर्टल वर चढवण्याचे काम चालू असल्याचे लेखी आश्वासन दिल्यामुळे आंदोलन थांबविण्यात आले होते त्यानंतर १५ दिवसांचा कालावधी लोटून सुद्धा संत्रा फळ पिक विमा दाव्याची रक्कम संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेली नसल्यामुळे अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकरी आक्रमक झालेले आहेत.
शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या, शेतकऱ्यांना विमा मदतीपासून वंचित ठेवणाऱ्या युनिव्हर्सल सोम्पो इन्शुरन्स विमा कंपनीवर कार्यवाही करून तत्काळ संत्रा फळ पिक विम्याचे पैसे १३ डिसेंबर २०२५ पर्यंत संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्यास १४ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेऊन सत्ताधारी नेत्यांना, मंत्र्यांना जागे करण्यासाठी अधिवेशनामध्ये आंदोलन करण्याचा ईशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रुपेश वाळके यांच्या तर्फे शासनाला देण्यात आला आहे.








