Sunday, April 12, 2026
spot_imgspot_img
spot_img

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आर. विमला यांच्या ‘जियो मन’ काव्यसंग्रहाचे नवी दिल्लीत प्रकाशन

नवी दिल्ली :- प्रशासकीय जबाबदाऱ्यांचे चक्र अहोरात्र सुरू असतानाही आपल्यातील सर्जनशीलता आणि संवेदनशीलता जिवंत ठेवणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांच्या ‘जियो मन’या हिंदी काव्यसंग्रहाचे प्रकाशन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अत्यंत दिमाखदार सोहळ्यात पार पडले. नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे आयोजित ‘प्रथम अखिल भारतीय मराठी महिला शासकीय अधिकारी साहित्य संमेलना’चे औचित्य साधून हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला.

महाराष्ट्र सदन, मराठी भाषा विभाग आणि सरहद संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या दोन दिवसीय संमेलनाच्या उद्घाटन सत्रात हा विशेष सोहळा रंगला. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत, संमेलनाध्यक्षा तथा ज्येष्ठ लेखिका लीना मेहंदळे, माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, सहमहालेखा नियंत्रक सुप्रिया देवस्थळी, मुख्य संयोजक सुषमा नहार आणि लेशपाल जवळगे यांसह प्रशासकीय व साहित्यिक क्षेत्रातील नामवंत उपस्थित होते.

आर. विमला यांचा ‘जियो मन’ हा काव्यसंग्रह मानवी आयुष्यातील चढ-उतार, संघर्ष आणि त्यातून मार्ग काढणाऱ्या दुर्दम्य आशावादाचे प्रतिबिंब आहे. मूळ तामिळ भाषक असूनही त्यांनी हिंदी भाषेवर मिळवलेले प्रभुत्व आणि त्या माध्यमातून मांडलेल्या भावभावना थक्क करणाऱ्या आहेत. या संग्रहात जीवनातील विविध रंग—प्रेम, वेदना, स्मृती आणि संघर्षाचा प्रवास शब्दांकित करण्यात आला आहे. प्रत्येक अंधारानंतर एक नवी पहाट असतेच, हा या संग्रहाचा केंद्रबिंदू असून, वाचकाला स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेण्यास प्रवृत्त करणाऱ्या रचना यामध्ये आहेत.

आर. विमला यांनी त्यांच्या तीन दशकांच्या प्रशासकीय कारकिर्दीत महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकास क्षेत्रात मोठे कार्य केले आहे. हेच अनुभव त्यांच्या कवितांमध्ये प्रतिबिंबित होताना दिसतात. त्यांच्या कवितांची शैली साधी, सोपी पण थेट हृदयाला भिडणारी आहे. क्लिष्ट अलंकारिकते पेक्षा शब्दांतील सच्चेपणा वर त्यांनी अधिक भर दिला आहे. ‘जियो मन’ हा त्यांचा दुसरा काव्यसंग्रह असून, यापूर्वी त्यांचा ‘मन रचनाएं’ हा संग्रह रसिकप्रिय ठरला आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com