spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मुख्यमंत्री सहायता कक्षाने मेंदू आजाराच्या रुग्णाला दिला आधार

शस्त्रक्रियेसाठी मिळाली एक लाखाची मदत

छ.संभाजीनगर येथे झाली जटील शस्त्रक्रिया

यवतमाळ, दि. १९  : कोणत्या वयात कोणता आजार होईल सांगता येत नाही. अशा आजारांवर फार मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. हा खर्च सर्वसामान्य गरीब रुग्णांना परवडण्यासारखा नसतो. त्यामुळे आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना आजारांवरील उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाच्यावतीने आर्थिक मदत दिली जाते. उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथील एका महिला रुग्णास मेंदूच्या शस्त्रक्रियेसाठी सहायता निधीने मोठा हातभार लावला आहे.

उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथील दिपाली किशोर जन्नावार यांना एपीलिप्सी या आजाराचा त्रास होता. त्यासाठी त्यांना मेंदूची जटील शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. एपीलिप्सीच्या उपचारासाठी त्यांना छत्रपती संभाजी नगर येथील ओरिऑन क्रिटीकेअर सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयाने शस्त्रक्रिया करणे गरजेचे असून त्यासाठी मोठा खर्च सांगितला होता.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाद्वारे उपचारासाठी आर्थिक मदत दिली जात असल्याचे त्यांना समजले होते. त्याप्रमाणे त्यांनी यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या सहायता कक्षाशी संपर्क साधून मदतीसाठी अर्ज सादर केला. कक्षाच्यावतीने त्यांचा अर्ज तपासून मंजूरीसाठी पाठविण्यात आला होता. त्यानंतर त्यांना शस्त्रक्रियेसाठी एक लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर झाली. या मदतीने त्यांना ऐनवेळी मोठी दिलासा दिला.

ओरिऑन क्रिटीकेअर सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे उपचाराचा मोठा खर्च सांगितला होता. उपचारासाठी रक्कमेची जुळवाजुळव करणे कठीण होते. अशावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाकडे अर्ज केला आणि काही दिवसातच एक लाख रुपये मंजूर झाले. या रक्कमेमुळे मोठा आधार मिळाला. यासाठी कक्षाचे डॅा.प्रसाद बन्सोड यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. सर्वसामान्य रुग्णांना उपचारासाठी चांगली सुविधा कक्षाच्या माध्यमातून जिल्हास्तरावरच उपलब्ध करून दिल्याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानते, अशा शब्दात दिपाली जन्नावार यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्यावतीने विविध आजारांसाठी सहाय्य दिले जाते. त्यात कॉकलियर इम्प्लांट, अंतस्त कर्णरोपण शस्त्रक्रिया वय 2 वे 6 वर्ष, हृदय प्रत्यारोपण, यकृत प्रत्यारोपण, मूत्रपिंड प्रत्यारोपण, फुफ्फुस प्रत्यारोपण, अस्थी मज्जा प्रत्यारोपण, हाताचे प्रत्यारोपण, खुब्याचे प्रत्यारोपण, कर्करोग शस्त्रक्रिया, कर्करोग औषधोपचार किरणोपचार, अस्थिबंधन, नवजात शिशुचे संबंधित आजार, गुडघ्याचे प्रत्यारोपण, रस्ते अपघात, लहान बालकांच्या संबंधित शस्त्रक्रिया, मेंदुचे आजार, हृदयरोग, डायलिसिस, जळीत रुग्ण, विद्युत अपघात, विघुत जळीत रुग्ण आदी उपचार, शस्त्रक्रियांचा समावेश आहे.

Popular Articles