spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

फ्रॅक्चर कवटीच्या शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री सहायता कक्षाचा हातभार कक्षाच्या सहाय्याने एक लाखाची मदत

यवतमाळ, दि.20  : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना उपचार, शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्यावतीने आर्थिक मदत उपलब्ध करुन दिली जाते. आता यवतमाळातच कक्ष सुरु झाल्याने रुग्णांना मुंबई येथे जाण्याची गरज नाही. जिल्ह्यात अनेक रुग्णांना कक्षाने मदतीचा हात दिला आहे. अपघातात डोक्याच्या कवटीला जबर मार असलेल्या एका युवकासाठी ही योजना जीवनदान देणारी ठरली आहे.

यवतमाळ येथील निलेश गोविंदराव डोळे या 39 वर्ष वयाच्या युवकाचा एक वर्षापूर्वी अपघात झाला होता. या अपघातात त्याचा डोक्याला जबर इजा झाली होती. वैद्यकीय तपासणीनंतर त्याच्या डोक्याच्या कवटीला फ्रॅक्चर झाले असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे त्याच्या कवटीची शस्त्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक होते. निलेश घरातील एकूलता एक कमावणारा असल्याचे त्याच्या घरची मंडळी देखील चिंतेत पडली होती.

अपघाताच्यावेळी उपचारासाठी बराच खर्च झाला होता. कवटीच्या शस्त्रक्रियेसाठी निलेशला नागपूर येथील न्यू ईरा हॅास्पिटल ॲन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट येथे दाखविण्यात आले होते. हॅास्पिटलने शस्त्रक्रियेसाठी बराच खर्च सांगितला होता. त्यामुळे कुटुंबांतील सदस्य चिंतेत पडले होते. त्यांना यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु झालेल्या मदत कक्षाची माहिती मिळाल्याने त्यांनी रितसर अर्ज केला. कक्षातील डॉ.प्रसाद बन्सोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी अर्जाची तपासणी करुन अर्ज मंजुरीसाठी पाठवला. त्यानंतर शस्त्रक्रियेसाठी एक लाखाची मदत मंजूर करण्यात आली.

या मदतीच्या सहाय्याने निलेशवर नागपूरच्या न्यू ईरा हॅास्पिटलमध्ये कवटीच्या फ्रॅक्चरची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. मुख्यमंत्री मदत कक्षाचा शस्त्रक्रियेसाठी मोठी हातभार लाभला. ऐनवेळी मदत मंजूर झाल्याने जी चिंता होती ती मिटली. जिल्हास्तरावर सुरु झालेला हा कक्ष अतिशय चांगला असून रुग्णांना हातभार लावणार आहे, असे निलेश डोळे यांनी सांगितले.

वैद्यकीय उपचार, शस्त्रक्रियेच्या मदतीसाठी रुग्ण जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षास संपर्क साधू शकतात किंवा गरज असल्यास https://cmrf.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्जासोबत आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, राशन कार्ड, वैद्यकीय अहवाल, खर्चाचे अंदाजपत्रक जोडणे आवश्यक असते. मदतीच्या लाभासाठी रुग्ण राज्याचा निवासी व त्याचे उत्पन्न एक लाख 60 हजारापेक्षा कमी असावे. जिल्ह्यामध्ये 22 रुग्णालय व तीन धर्मदाय रुग्णालयांचा मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष योजनेत समावेश आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.