– मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष व कौशल्य विकास केंद्रास भेट आणि पाहणी
गडचिरोली :- नक्षलवादामुळे बाधित झालेल्या कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी व त्यांच्या सामाजिक-आर्थिक सक्षमीकरणासाठी नुकतेच शासन सेवेत सावावून घेण्यात आलेल्या उमेदवारांशी मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी संवाद साधला. यासोबतच विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकासाच्या सुविधा निर्माण करणाऱ्या इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड ट्रेनिंग सेंटर तसेच गरजू रुग्णांना तातडीची मदत देणाऱ्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाला काल भेट देवून त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.
नक्षलवादी हिंसाचारात गोपनीय माहितीदारांची हत्या झालेल्या कुटुंबांना दिलासा देण्यासाठी शासन निर्णयान्वये अशा कुटुंबातील एका सदस्यास शासनसेवेत सामावून घेण्याची तरतूद आहे. या तरतुदीनुसार ०१ जानेवारी २०२६ रोजी नक्षलपीडित कुटुंबातील २९ तरुणांना जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत शिपाई पदावर रुजू करून घण्यात आले होते. यातील जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत उमेदवारांशी मुख्य सचिवांनी संवेदनशीलतेने संवाद साधला. कुटुंबातील घटना कधी घडली, सध्या घरची परिस्थिती कशी आहे, कुटुंबात कोण-कोण आहेत याची आस्थेने विचारपूस करत त्यांनी उमेदवारांना पुढील शिक्षण सुरू ठेवण्याचा सल्ला दिला तसेच शासकीय सेवेत प्रामाणिकपणे कार्य करून उज्ज्वल भविष्यासाठी वाटचाल करण्याची प्रेरणा दिली.![]()
मुख्य सचिवांनी जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षालाही आकस्मिक भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी संबंधित योजनांची कार्यपद्धती, वैद्यकीय उपचारासाठी लाभार्थ्यांना दिली जाणारी आर्थिक मदत तसेच निधी वितरणाची प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती घेतली. गरजू व गरीब रुग्णांना वेळेत, पारदर्शक आणि मानवी दृष्टिकोनातून मदत मिळेल, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
यानंतर मुख्य सचिवांनी गोंडवाना विद्यापीठ परिसरातील सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड ट्रेनिंग (CIIIT) येथे भेट देऊन विद्यार्थ्यांशी सविस्तर संवाद साधला. प्रशिक्षणाचे कालावधी, उपलब्ध अभ्यासक्रमांची संख्या, प्रमाणपत्र कोण देतात, प्रशिक्षणाची पद्धत तसेच प्रत्यक्ष कोणती कौशल्ये शिकविली जातात, याबाबत त्यांनी माहिती घेतली. विद्यार्थ्यांना संगणकावर प्रत्यक्ष प्रकल्प उघडून दाखवण्यास सांगत येथे उपलब्ध असलेली आधुनिक यंत्रसामग्री कशी कार्य करते याचीही त्यांनी विचारणा केली. या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून गडचिरोलीतील विद्यार्थ्यांसाठी रोजगारक्षम कौशल्ये विकसित करण्याची महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध झाली असून, या संधीचा पुरेपूर लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
यावेळी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू प्रशांत बोकारे, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी योगेंद्र शेंडे, अपर जिल्हाधिकारी नितीन गावंडे, निवासी उपजिल्हाधिकारी आशिष वानखेडे, वैद्यकीय कक्ष प्रमुख डॉ. मनोहर मडावी तसेच जिल्हा समन्वयक हर्षाली नैताम आदी उपस्थित होते.