अमरावती १३ : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला अमरावती महानगरपालिका संपूर्ण शहरात देशभक्तीची भावना पसरवत आहे. महानगरपालिकेची मुख्य इमारत तसेच विविध महानगरपालिका कार्यालये, बाजारपेठा, मॉल इत्यादी आकर्षक विद्युत सजावटीने सजवण्यात आल्या आहेत. दिव्यांच्या मनमोहक सजावटीने शहरवासीयांचे लक्ष वेधले आहे आणि संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त महानगरपालिकेच्या इमारतीत विशेष रोषणाई करण्यात आली आहे आणि रात्रीच्या वेळी ही सजावट विशेषतः दिसून येते. “हर घर तिरंगा” या केंद्रीय मोहिमेच्या अनुषंगाने अमरावती महानगरपालिका नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी आणि भारतीय राष्ट्रध्वजाशी त्यांचे वैयक्तिक नाते दृढ करण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे. ही मोहीम २ ऑगस्ट २०२५ ते १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत तीन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. या काळात शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने विविध सांस्कृतिक कार्यक्रम, प्रभातफेरी, तिरंगा रॅली, चित्रकला स्पर्धा, देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. शहरातील मुख्य चौक, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणे तिरंग्याने सजवण्यात आली आहेत आणि नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. अनेक घरे, दुकाने आणि इमारतींच्या छतावर तिरंगा फडकत आहे. या उत्साहात सहभागी होऊन शिस्त आणि स्वच्छतेची काळजी घेऊन राष्ट्रध्वज आदराने फडकवावा असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना केले आहे. यावर्षी स्वातंत्र्यदिन तिरंग्याच्या सजावटीने आणि नागरिकांच्या उत्साहाने साजरा केला जाईल असा विश्वास आहे.








