नागपूर :- मनपा आयुक्त डॉ विपीन यांनी शनिवारी (ता.११) सेंट झेवियर्स शाळा ते अशोक चौक दरम्यानच्या नदी सफाई, सक्करदरा दत्तात्रय नगर येथील संत ज्ञानेश्वर उद्यान, व्हीएनआयटी समोरील वॉकेबल स्ट्रीट मार्ग आणि चिल्ड्रेन पार्क ते लक्ष्मी भवन चौक दरम्यानच्या मार्गाची, अंबाझरी जलपर्णी काढण्याच्या कामाची पाहणी केली.
याप्रसंगी विविध ठिकाणी मुख्य अभियंता मनोज तालेवार, अधीक्षक अभियंता लीना उपाध्ये, डॉ. श्वेता बॅनर्जी, उद्यान उपायुक्त गणेश राठोड, सहायक आयुक्त राजकुमार मेश्राम घनश्याम पंधरे, कार्यकारी अभियंता श्रीकांत वाईकर, गिरीश लिखार, मनोज गद्रे, उद्यान संवर्धक अमोल चौरपगार यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मनपा आयुक्त डॉ.विपिन यांनी अशोक चौक ते सेंट झेवियर्स शाळेदरम्यान सुरू असलेल्या नदी-नाला सफाई कार्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी सफाई कामासाठी तैनात करण्यात आलेल्या पोकलेन आणि जेसीबी मशीनचा वापर पूर्ण क्षमतेने करावा, कामाचा वेग वाढवण्यासाठी गरज पडल्यास अतिरिक्त यंत्रसामग्री लावावी असे निर्देश दिले. याप्रसंगी मुख्य अभियंता मनोज तालेवार आणि सहायक आयुक्त घनश्याम पंधरे, कार्यकारी अभियंता गिरीश लीखार उपस्थित होते.
मुलांसाठी उभारणार बहुउद्देशीय क्रीडांगण
यानंतर आयुक्तांनी सक्करदरा, दत्तात्रय नगर येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाला भेट दिली. यावेळी त्यांनी उद्यानातील जॉगिंग ट्रॅक, सुरक्षा भिंत आणि लहान मुलांच्या खेळण्याच्या ठिकाणाची पाहणी केली. आयुक्तांनी उद्यानातील दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्यासोबतच, मुलांसाठी येथे स्केटिंग ट्रॅक, बॅडमिंटन आणि बास्केटबॉल अशा विविध खेळांची सोय असलेले ‘बहुउद्देशीय मैदान’ तयार करण्याचे आदेश दिले. याप्रसंगी उद्यान उपायुक्त गणेश राठोड, उद्यान संवर्धक अमोल चौरपगार व नागरिक उपस्थित होते.
तसेच शहराच्या सौंदर्यीकरणाचा भाग असलेल्या व्हीएनआयटी समोरील वॉकेबल स्ट्रीट आणि चिल्ड्रेन पार्क ते लक्ष्मी भवन चौक दरम्यानच्या मार्गाचीही आयुक्त डॉ. विपीन यांनी पाहणी केली. हे काम सुरू करण्यापूर्वी स्थानिक लोकप्रतिनिधी, पीएमसी आणि आर्किटेक्ट यांच्याशी सविस्तर चर्चा करूनच अंतिम आराखडा निश्चित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी नगरसेवक विजय होले, अधीक्षक अभियंता लीना उपाध्ये, सहाय्यक आयुक्त राजकुमार मेश्राम, कार्यकारी अभियंता मनोज गद्रे उपस्थित होते. याशिवाय त्यांनी अंबाझरी तलावातील जलपर्णी काढण्याच्या कामाची पाहणी केली. याप्रसंगी अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता श्रीकांत वाईकर आदी उपस्थित होते.