spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

गोवंश कत्तल करणाऱ्या आरोपींची भंडारा शहरातून धिंड; कारधा पोलिसांचा गुन्हेगारांना कडक इशारा

– भरचौकातून काढला ‘जुलूस’; पाहायला नागरिकांची मोठी गर्दी

हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- कारधा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नेहरू वार्डात गोवंश कत्तल करणाऱ्या आरोपींना बेड्या ठोकल्यानंतर, आज पोलिसांनी त्यांची शहराच्या मुख्य भागातून धिंड (जुलूस) काढली. गुन्हेगारांवर कायद्याचा वचक बसावा आणि अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांना जरब बसावी, या उद्देशाने प्रशासनाने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

९ जानेवारी रोजी कारधा पोलिसांनी नेहरु वार्ड परिसरात छापा टाकून आर्थिक फायद्यासाठी गायीची कत्तल करणाऱ्या टोळीला पकडले होते. या प्रकरणी अस्लम अजीज शेख (४५, रा. बैरागी वार्ड, भंडारा), परवेज रऊफ खान (३२, रा. बाबा मस्तानशहा वार्ड, भंडारा), एक अनोळखी इसम, अजीम अजीज कुरेशी (३८, रा. अन्सारी वार्ड, बैरागी वाडा, भंडारा त्यांच्याकडून १० हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला होता.

आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांना भंडारा शहरातील प्रमुख मार्गांवरून पायी फिरवले. भररस्त्यातून आरोपींची धिंड काढली जात असल्याचे पाहून नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. “गुन्हेगारांची गय केली जाणार नाही,” असा जणू संदेशच या कारवाईतून पोलिसांनी दिला आहे. या ‘जुलूस’मुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे आणि रेती माफिया तसेच कसाई टोळीचे धाबे दणाणले आहेत.

जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या गुन्हेगारी प्रवृत्तींविरुद्ध विशेष मोहीम राबवली जात आहे. केवळ गुन्हा दाखल करून न थांबता, आरोपींना सार्वजनिकरीत्या रस्त्यावरून नेल्यामुळे पोलिसांच्या या भूमिकेचे काही नागरिकांनी स्वागत केले आहे.

सदर कारवाईमुळे शहरात शांतता राखण्यासाठी आणि गोवंश हत्या रोखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कारधा पोलीस अधिक वेगाने करत आहेत.

Popular Articles