Saturday, March 28, 2026
spot_imgspot_img
spot_img

भंडाऱ्यात ग्राहकाची फसवणूक; नव्या गाडीऐवजी दिली बिघाडग्रस्त दुचाकी, शोरूम मालकाविरोधात पोलिसांत तक्रार

हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- स्थानिक गणेशपूर येथील ‘न्यू इरा मोटर्स’ या होंडा शोरूमने एका ग्राहकाला चक्क बिघाडग्रस्त गाडी विकून त्याची आर्थिक व मानसिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शोरूममधून काढल्यापासून अवघ्या ५ किलोमीटरवर गाडी बंद पडली असून, गेल्या दोन महिन्यांपासून गाडी शोरूममध्येच धूळ खात पडून आहे. याप्रकरणी पिंपळगाव (ता. मोहाडी) येथील पीडित तरुण वैभव चोपकर याने भंडारा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वैभव चोपकर यांनी १६ ऑगस्ट २०२५ रोजी न्यू इरा मोटर्समधून १ लाख ४० हजार रुपये किमतीची ‘होंडा युनिकॉर्न’ गाडी फायनान्सवर खरेदी केली होती. मात्र, शोरूममधून गाडी घेऊन गावी जात असताना अवघ्या ५ किलोमीटर अंतरावरच गाडीचे गिअर अडकले आणि गाडी बंद पडली. त्यावेळी शोरूमच्या मेकॅनिकने घटनास्थळी येऊन दुरुस्ती केली आणि “नवीन गाडीत असे प्रॉब्लेम येतात” असे सांगून ग्राहकाची बोळवण केली. त्यानंतर गाडीत वारंवार बिघाड होत राहिला. या बिघाडग्रस्त गाडीमुळे दोनवेळा अपघाताच्या गंभीर घटना घडता घडता वाचल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे.

वारंवार तक्रार करूनही शोरूम प्रशासनाने केवळ आश्वासने देऊन वेळ मारून नेली. अखेर १५ जानेवारी २०२६ रोजी गाडी पुन्हा शोरूममध्ये दुरुस्तीसाठी देण्यात आली. मात्र, तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे जवळपास दोन महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी गाडी दुरुस्त करून मिळालेली नाही. “पार्ट्स आले नाहीत” असे कारण देऊन शोरूम कर्मचारी टाळाटाळ करत आहेत. एकीकडे गाडी शोरूममध्ये उभी आहे आणि दुसरीकडे वैभव यांना दरमहा ३ हजार ७० रुपयांचा हप्ता विनाकारण भरावा लागत आहे.

या संदर्भात २० मार्च रोजी वैभव शोरूम मालक यांना भेटायला गेले असता, त्यांनी भेट नाकारून मॅनेजरकडे पाठवले आणि अपमानित करून शोरूमबाहेर काढल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. फसवणूक आणि मानसिक छळामुळे त्रस्त झालेल्या वैभव चोपकर यांनी अखेर पोलिसांत धाव घेत शोरूम मालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये संतापाचे वातावरण असून पोलीस आता याप्रकरणी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    “गाडीच्या इंजिनमध्ये कोणताही बिघाड नव्हता, केवळ गिअर अडकत होते ते आम्ही दुरुस्त केले आहे. वॉरंटीनुसार जो पार्ट बिघडतो तो आम्ही बदलून देतो.”

– सर्व्हिस मॅनेजर पवन भोंगाडे


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com