– मेजर हेमंत जकाते विद्यालयतील विद्यार्थ्यांना सायबर हायजीन व एथिक्स या विषयावर मार्गदर्शन
नागपूर :- एडुसन फाउंडेशन आणि सायबर सेल, नागपूर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने मेजर हेमंत जकाते विद्यानिकेतन स्कूल, म्हाळगी नगर येथे विद्यार्थ्यांसाठी ‘सायबर हायजीन व सायबर एथिक्स’ या विषयावर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शाळेतील १४८ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमात सायबर सेलचे तन्मय रायसने यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. ऑनलाइन फसवणूक, मोबाईल गेमिंगच्या माध्यमातून होणारे फ्रॉड, अनोळखी APK फाइल्स व ॲप्स, सायबर बुलिंग तसेच सोशल मीडियाचा सुरक्षित आणि जबाबदार वापर याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच वैयक्तिक माहिती, पासवर्ड किंवा अन्य संवेदनशील तपशील अनोळखी व्यक्तींशी शेअर करू नयेत, संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये आणि अनोळखी फाइल्स अथवा ॲप्स डाउनलोड करण्यापूर्वी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

एडुसन फाउंडेशनचे संचालक निलेश काळे यांनी विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अनावश्यक वापर टाळून त्याचा उपयोग ज्ञान, अध्ययन आणि कौशल्यविकासासाठी करावा, असे सांगितले. मोबाईल आणि इंटरनेटचा वापर करताना वेळेचे भान ठेवणे तसेच सोशल मीडियापेक्षा वाचन, अभ्यास आणि सर्जनशील उपक्रमांना प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका शीला मुडे होत्या. विशेष अतिथी म्हणून देवराव एस.प्रधान उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन भावना निनावे यांनी केले. कार्यक्रमाच्या समारोपावेळी विद्यार्थ्यांनी ‘सायबर हायजीन व सायबर एथिक्स’ची शपथ घेतली. तंत्रज्ञानाचा वापर सुरक्षित, जबाबदार आणि नैतिक पद्धतीने करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला. बदलत्या डिजिटल युगात सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणारा हा उपक्रम उपयुक्त ठरला.








