Wednesday, March 11, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नागपूर विभागातील शिक्षकांच्या प्रलंबित पगाराबाबत एसआयटी अहवालानंतर निर्णय – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

मुंबई :- नागपूर विभागातील काही शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित वेतनाबाबत विशेष तपास पथकचा (एसआयटी) अंतिम अहवाल आल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

याबाबत सदस्य सुधाकर अडबाले यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य अभिजीत वंजारी यांनी उपप्रश्न उपस्थित केला.

राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले, नागपूर विभागातील काही शाळांमध्ये शासनाची परवानगी न घेता तसेच पात्रता निकष पूर्ण न करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणात शालार्थ आयडीच्या माध्यमातून अनियमितता समोर आल्यामुळे संबंधित बिलांना सध्या स्थगिती देण्यात आली आहे.

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्यात आली असून एसआयटीचा अंतिम अहवाल आल्यानंतर पात्र शिक्षकांच्या वेतनाबाबत निर्णय घेतला जाईल.

काही शिक्षकांनी या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि न्यायालयाने वेतन देण्याच्या सूचना केल्या होत्या. या आदेशाविरोधात राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देत चार आठवड्यांत सुनावणी घेऊन निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहितीही मंत्री डॉ. भोयर यांनी दिली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com