spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नागपूर सुधार प्रन्यासातील कथित अनियमिततेची चौकशीची मागणी; शिवसेनेचे सभापतींना निवेदन

नागपूर :- नागपूर सुधार प्रन्यास (एनआयटी) च्या पूर्व विभागातील कथित अनियमितता, इमारत बांधकाम परवानगी, आरएल (RL) डिमांड प्रकरणे तसेच गुठेवारी विभागातील अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना (शिंदे गट) नागपूर शहर जिल्हाप्रमुख गौरव रामकुमार गुप्ता यांनी नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मीना यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदनात पूर्व विभागातील विविध प्रकरणांमध्ये गंभीर स्वरूपाच्या अनियमितता, दिरंगाई आणि मनमानी होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. वाठोडा परिसरातील एका बांधकाम परवानगी प्रकरणात आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही मंजुरी प्रक्रियेत अडथळे निर्माण करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच ‘कॉमन वॉल’चे कारण पुढे करून मंजूर बांधकाम परवाना रद्द करण्यात आल्याच्या प्रकरणाचीही निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, वाठोडा परिसरातील काही सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या ले- आऊटसाठी आर एल डिमांड देने बंद करण्यात आल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. हा निर्णय कोणत्या नियम अथवा शासन आदेशानुसार घेण्यात आला, याची अधिकृत माहिती नागरिकांसमोर जाहीर करावी. तसेच संबंधित ले- आऊट कोणत्या आरक्षणासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत, याबाबतही स्पष्टता देण्याची मागणी करण्यात आली आहे.

गुंठेवारी विभागातील काही अधिकारी व कर्मचारी नागरिकांशी उद्धट वर्तन करत असून, विनाकारण फायली प्रलंबित ठेवून नागरिकांना त्रास दिला जात असल्याचाही आरोप निवेदनात केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र प्रशासकीय चौकशी करून संबंधित कार्यकारी अधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी आणि दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. या सर्व प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करून नागरिकांना न्याय द्यावा, अन्यथा नागपूर सुधार प्रन्यास कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना पदाधिकारी निरंजन दहीवाले यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

Popular Articles