spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र कायम; पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० कार्यकर्त्यांचा पक्षत्याग

सोलापूर : भाजपाच्या नव्या शहर कार्यकारिणीवरून सोलापूरमध्ये नाराजीचे वादळ उठले आहे. शहर उपाध्यक्ष अनंत जाधव यांनी बुधवारी कार्यकारिणी जाहीर होताच दोन तासांच्या आत राजीनामा दिल्यानंतर शुक्रवारी चिटणीस श्रीकांत घाडगे यांनीही पदाचा राजीनामा दिला. याचदरम्यान विविध पदांवर सक्रिय असलेल्या ५० हून अधिक कार्यकर्त्यांनीही पक्षाचे सदस्यत्व सोडले.

शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी बुधवारी कार्यकारिणी जाहीर केली होती. मात्र, निवडीमध्ये धनगर समाजाकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करण्यात आला. या समाजातील प्रशांत फत्तेपूरकर, राम वाकसे, राज बंडगर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी बैठकीनंतर सामूहिक राजीनामे दिले. त्यांनी आपली नाराजी व्यक्त करत पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन निवेदनही सादर केले. आणखी काही जुने कार्यकर्तेही लवकरच पक्षत्याग करतील, अशी शक्यता राम वाकसे आणि राज बंडगर यांनी व्यक्त केली.

दरम्यान, भाजपातील अंतर्गत राजकारणामुळे नाराजी वाढत चालली आहे. आमदार विजयकुमार देशमुख यांची शुक्रवारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत महापालिका निवडणुकीच्या तयारीसह भाजपातील अलीकडील घडामोडींवर चर्चा झाल्याचे समजते. सध्या भाजपामध्ये आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे या चार आमदारांमध्ये सुप्त संघर्ष सुरू असल्याची चर्चा आहे.

पालकमंत्री गोरे आणि आमदार देशमुख यांच्या भेटीत ‘महापालिकेत पुन्हा सत्ता आणण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करणे आवश्यक आहे’ असा संदेश देण्यात आला. मात्र, या बैठकीस देशमुख गटातील प्रमुख शिलेदार अनुपस्थित राहिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.