spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भुमीहीन लाभार्थ्यांना पटटे वाटप; गरजूंना घरे मिळण्याचा मार्ग मोकळा

– सेवा पंधरवडा

– जिल्ह्यात लोकाभिमुख उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी – पालकमंत्री संजय राठोड

यवतमाळ :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान ‘सेवा पंधरवडा’ साजरा केला जात आहे. नागरिक हाच केंद्रबिंदू मानून अधिकाधिक लोकाभिमुख उपक्रमांची अंमलबजावणी जिल्ह्यात होत आहे. हा उपक्रम केवळ मर्यादित कालावधीपुरता ठेवता सातत्याने राबविण्याचे निर्देश राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी आज येथे दिले.

प्रशासनाने नागरिक-केंद्रित सेवा वेगवान व पारदर्शक करण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. या उपक्रमांमध्ये नागरिकांच्या स्थानिक गरजा पूर्ण करण्यासाठी प्रमाणपत्र वाटप, सातबारा वितरण, महसूल अदालत आयोजित करणे, जिवंत सातबारा मोहीम चालवणे आणि मिशन उभारी अंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांसाठी करण्यात आलेल्या विविध उपक्रम आदींचा त्यात समावेश आहे. त्याबाबतचा आढावा पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील महसुल भवन येथे आयोजित आढावा बैठकीमध्ये घेतला, त्यावेळी ते बोलत होते.

गरजूंना पट्टेवाटप

पालकमंत्री राठोड यांच्या उपस्थि्तीत सेवा पंधरवड्यात भुमीहीन लाभार्थ्यांना पटटे वाटप करण्यात आले. सेवा पंधरवडा अंतर्गत सोनवाढोणा येथील भुमीहीन लाभार्थ्यांना पटटे वाटप करण्यात आले असून त्यामुळे अनेक कुटुंबांना त्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

याप्रसंगी जिल्हाधिकारी विकास मीना, यांनी मुख्यमंत्री यांच्या 150 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात राबविण्यात आलेले मिशन उभारी, महादर्पण(स्मार्ट अटेंडन्स व ॲक्टीव्हीटी व्यवस्थापन प्रणाली) व MRSAC, नागपूर यांच्या मदतीने पाणंद रस्त्यांचे जीओ रेफरन्सींग या उपक्रमांचे सादरीकरण केले.

मिशन उभारी

मिशन उभारी अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात मागील 5 वर्षात आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटूंबांचे सर्वेक्षण करण्यात आलेले असून सर्वेक्षणाचा डेटा उभारी पोर्टलवर अपलोड करण्यात आला आहे. सदर सर्वेक्षणानुसार पात्र असणाऱ्या सर्व शेतकरी कुटुंबांना शासकिय योजनांचा लाभ दिला जात असून सदर प्रक्रीयेवर पोर्टलच्या सहाय्याने लक्ष ठेवले जाणार जात आहे.

महादर्पण

महादर्पण या प्रणालीव्दारे क्षेत्रीय अधिकारी जसे ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांची उपस्थिती नोंदवली जाणार आहे. प्रत्येक अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्राचे जीओफेन्सींग करण्यात आले असून ते त्यांच्या कार्यक्षेत्रातून कूठूनही उपस्थिती लावू शकतात.

तसेच सदर प्रणालीच्या सहाय्याने शासनाचे विविध कार्यक्रम जसे महाराजस्व अभियान, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर, सेवा पंढरवडा अशा कार्यक्रमांतर्गत क्षेत्रीय अधिकारी यांनी केलेल्या कामाचे फोटो माहितीसह अपलोड करता येणार असून ते तहसिलदार ते जिल्हाधिकारी यांच्या पर्यंतच्या अधिकाऱ्यांना जिल्ह्याच्या नकाशावर दिसणार आहेत.

पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण; यवतमाळ जिल्हा राज्यात एक पाऊल पुढे

राज्यातील पाणंद रस्त्यांचे 1930 च्या जमाबंदीनंतर सर्वेक्षण करण्यात आले नव्हते. सबब महसूल मंत्री यांनी दिलेल्या सूचनेनूसार पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण संपूर्ण राज्यात सुरू करण्यात आले आहे. ह्या अभियानात यवतमाळ जिल्ह्याने एक पाऊल पुढे टाकले असून सर्व पाणंद रस्त्यांचे MRSAC नागपूरच्या मदतीने जीओ रेफरन्सींग करण्यासोबत एक विशिष्ठ नंबर दिला जाणार आहे. त्यामुळे सर्वच रस्ते गाव नकाशावर येणार असून गतीशक्ती पोर्टलवर पाणंद रस्त्यांचा लेअर आल्याने त्यांच्या मजबूतीकरणाचे नियोजनकरणे सोपे जाणार आहे.

यवतमाळ तालूक्यातील भारी या गावापासून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून 1 डिसेंबर 2025 पर्यंत जिल्ह्यातील सर्व गावातील पाणंद रस्त्यांचे जीओ रेफरन्सींग पूर्ण करण्याचा मानस जिल्हाधिकारी विकास मीना यांनी व्यक्त केला.

पालकमंत्री महोदयांनी जिल्हाधिकारी विकास मीना व उपस्थित सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले तसेच अशाच प्रकारे सर्वसामान्य नागरीकांच्या कल्याणासाठी नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे आवाहण केले. सदर उपक्रम राबवितांना काही मदतीची आवश्यकता असल्यास मदतीचे आश्वासन सुध्द दिले.

यावेळी जिल्हाधिकारी विकास मीना,मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी, जिल्हा कृषी अधीक्षक संतोष डाबरे, उपविभागीय अधिकारी गोपाल देशपांडे, विजय सूर्यवंशी, तहसिलदार योगेश देशमुख, पुरुषोत्तम भुसारी, रवि काळे तसेच सर्व तालुक्यातील तहसीलदार,गट विकास अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

Popular Articles