– भंडाऱ्यात महिला व बालविकास विभाग आणि ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने भव्य कार्यक्रम
हंसराज,प्रतिनिधी भंडारा :- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला व बालविकास विभाग आणि ओबीसी क्रांती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने भंडाऱ्यात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक एस. डी. प्रशासकीय महाविद्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात केवळ महिलांचा गौरवच झाला नाही, तर समाजातील महिलांच्या सद्यस्थितीवर आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायावर गंभीर मंथनही करण्यात आले.
या कार्यक्रमात उपस्थित महिलांनी आपल्या भावना व्यक्त करताना समाजाला आरसा दाखवला. “एका बाजूला आपण स्त्रीला ‘देवी’ आणि ‘मातृशक्ती’ म्हणून गौरवितो, पण दुसऱ्या बाजूला तिच्या आयुष्यावर अनेक अदृश्य मर्यादा लादल्या जातात. हा केवळ औपचारिक सोहळा नसावा, तर समाजात स्त्रीचा खऱ्या अर्थाने सन्मान व्हायला हवा,” अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. देशात महिलांवर होणारे अन्याय आणि अत्याचाराचा आढावा घेताना, केवळ परंपरेसाठी गौरव न करता सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे मत यावेळी मांडण्यात आले.
कार्यक्रमासाठी एस. डी. महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष रोशन जांभुळकर यांनी जागा उपलब्ध करून दिली. यावेळी ओबीसी क्रांती मोर्चाच्या महिला जिल्हाध्यक्ष शोभा बावनकर, जिल्हाध्यक्ष संजय मते, प्रमुख अतिथी वैशाली सतदेवे, जिल्हा समन्वयक लोकप्रिया देशभ्रतार, विजया वंजारी, शकुंतला पाटील, नालंदा पाटील, शीतल गेडाम, मीनाक्षी चव्हाण, मंजू आंबाडहारे, मनीषा भांडारकर, कोमल दुबे, पूजा पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन विक्की सेलोटे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सुरेखा गायधने यांनी मानले. या उपक्रमातून महिलांच्या हक्क आणि सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्यात आली असून, उपस्थितांनी या चर्चेचे स्वागत केले आहे.