Tuesday, March 10, 2026
spot_imgspot_img
spot_img

महागाई आणि इंधन दरवाढीवरून खा. डॉ. प्रशांत पडोळे आक्रमक; संसद भवनासमोर केली निदर्शने

– पंतप्रधानांनी संसदेत येऊन उत्तर देण्याची मागणी; भंडारा-गोंदियाच्या खासदारांचा सरकारवर प्रहार

हंसराज प्रतिनिधी भंडारा, दिल्ली :- देशात दिवसेंदिवस वाढत असलेली महागाई आणि इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. या मुद्द्यावरून भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी आज दिल्लीत संसद भवनासमोर जोरदार निदर्शने केली. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे जनतेचे कंबरडे मोडले असून, सरकारने यावर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

इंधन दरवाढ आणि परराष्ट्र धोरणावर प्रश्नचिन्ह

खासदार डॉ. पडोळे यांनी संसदेच्या परिसरात आवाज उठवताना सांगितले की, रशिया आणि इराणसारख्या देशांनी पूर्वी भारताला कमी दरात तेल पुरवून मदत केली होती. मात्र, सध्याच्या जागतिक दबावामुळे आणि सरकारच्या बदलत्या परराष्ट्र धोरणामुळे भारताच्या हितावर परिणाम होत आहे. वाढत्या तेल आणि गॅसच्या किमतींचा थेट फटका देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांना बसत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

खासदार पडोळे यांनी आखाती (गल्फ) देशांमध्ये काम करणाऱ्या सुमारे ४३ लाख भारतीयांच्या सुरक्षिततेचा मुद्दाही लावून धरला. आंतरराष्ट्रीय संघर्षामुळे तिथे अडकलेल्या या भारतीयांना सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली.

“भाजप सरकारला सर्वसामान्यांचे काही देणेघेणे आहे की नाही?” असा सवाल करत त्यांनी खाद्यपदार्थांवरील महागाईवरून सरकारवर टीका केली. जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले असून जनतेमध्ये संतापाची लाट आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः संसदेत येऊन वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि परराष्ट्र धोरणाबाबत देशाला स्पष्ट उत्तर द्यावे, अशी ठाम मागणी डॉ. प्रशांत पडोळे यांनी केली आहे.

सरकारने आंतरराष्ट्रीय व्यवहार आणि मोठ्या उद्योग समूहांशी संबंधित मुद्द्यांमध्ये पारदर्शकता ठेवावी, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com