मुंबई :- भारत निवडणूक आयोगाने इंडिया इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन डेमोक्रसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट (आयआयसीडीईएम)-२०२६ दरम्यान ‘ईसीआयनेट (ईसीआयएनईटी)’ या एकात्मिक डिजिटल प्लॅटफॉर्मचे उद्घाटन केले. २१ ते २३ जानेवारी २०२६ दरम्यान भरत मंडपम, नवी दिल्ली येथे ही तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या संकल्पनेतून, तसेच निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांच्या सहकार्याने ‘ईसीआयनेट’ची निर्मिती करण्यात आली असून, त्याची विकासाची घोषणा मे २०२५ मध्ये करण्यात आली होती.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितले की, हा प्लॅटफॉर्म कायद्याच्या चौकटीत विकसित करण्यात आला असून तो २२ अनुसूचित भाषा आणि इंग्रजीत उपलब्ध आहे. जगभरातील निवडणूक व्यवस्थापन संस्थांनी त्यांच्या देशांतर्गत कायदे व स्थानिक भाषांनुसार अशाच डिजिटल प्लॅटफॉर्मच्या विकासासाठी भारतासोबत सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू यांनी ईसीआयनेटमुळे निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता वाढून निवडणूक संस्थांवरील विश्वास दृढ होईल, तसेच कार्यपद्धतीवर प्रभावी देखरेख, जलद निर्णयप्रक्रिया आणि माहितीचा वेगवान प्रसार शक्य होईल, असे नमूद केले. तर डॉ. विवेक जोशी यांनी या परिषदेमुळे तंत्रज्ञान आणि डिजिटल नवकल्पनांच्या वापराबाबत जागतिक सर्वोत्तम पद्धती जाणून घेण्याची संधी निवडणूक संस्थांना मिळणार असल्याचे सांगितले.
माहिती तंत्रज्ञान विभागाच्या महासंचालक डॉ.सीमा खन्ना यांनी सादरीकरणात सायबर सुरक्षेला ईसीआयनेट मुख्य आधारस्तंभ असल्याचे स्पष्ट केले. आज तंत्रज्ञान केवळ सहाय्यक भूमिका बजावत नसून, ते धोरणात्मक सक्षमक बनले असल्याचे त्यांनी सांगितले. ‘ईसीआयनेट’मुळे निवडणुकांमध्ये पारदर्शकता, कार्यक्षमता, विश्वासार्हता आणि जनतेचा विश्वास वाढेल, असेही त्यांनी नमूद केले.
ईसीआयनेट हा जगातील सर्वात मोठा निवडणूक सेवा प्लॅटफॉर्म असून, भारतासारख्या जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीतील निवडणूक आयोगाच्या ४० हून अधिक अॅप्स आणि पोर्टल्सचे एकत्रीकरण यात करण्यात आले आहे. भारतीय संविधान, लोकप्रतिनिधी अधिनियम १९५० व १९५१, मतदार नोंदणी नियम १९६० आणि निवडणूक आचार नियम १९६१ यांच्याशी पूर्ण सुसंगततेने हा प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आला आहे.
या प्लॅटफॉर्मद्वारे नागरिक, उमेदवार, राजकीय पक्ष आणि निवडणूक अधिकारी एकाच सुरक्षित प्रणालीवर जोडले गेले आहेत. मतदार नोंदणी, मतदार यादी शोध, अर्जाची स्थिती तपासणे, उमेदवारांची माहिती, निवडणूक अधिकाऱ्यांशी संपर्क, बीएलओसोबत कॉल बुकिंग, ई-ईपीआयसी डाउनलोड, मतदान प्रवृत्ती आणि तक्रार निवारण अशा अनेक सेवा येथे उपलब्ध आहेत.
ईसीआयनेटची बीटा आवृत्ती २०२५ बिहार विधानसभा निवडणुका आणि विशेष सघन पुनरिक्षण (एसआयआर) दरम्यान यशस्वीपणे वापरण्यात आली. यामध्ये नागरिकांच्या सूचनांचा विचार करून अंतिम स्वरूप देण्यात आले. आतापर्यंत या प्लॅटफॉर्मवरून १० कोटींहून अधिक नोंदणी अर्जांवर प्रक्रिया झाली असून, दररोज सरासरी २.७ लाख अर्ज हाताळले जात आहेत. ११ लाखांहून अधिक बूथ लेव्हल ऑफिसर्स (बीएलओ) नोंदणीकृत असून, १५० कोटींहून अधिक दस्तऐवजांचे डिजिटायझेशन करण्यात आले आहे. तसेच, क्षेत्रीय पातळीवरील कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर प्रभावी देखरेख करण्याची सुविधाही या प्रणालीत उपलब्ध आहे, असे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धापत्रकाद्वारे कळविले आहे.