– निळकंठ मस्के यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड
कन्हान :- देशभरातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना (एफपीसी) एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देण्या साठी राष्ट्रीय फार्मर प्रोड्युसर कंपनी फेडरेशनची स्थापना करण्यात आली असुन या नव्याने स्थापन झालेल्या फेडरेशनच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निळकंठ मस्के, कन्हान यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
पुणे येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या व्हीआयपी गेस्ट हाऊसमध्ये नुकतीच देशातील विविध फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्या प्रतिनिधींची महत्त्वपुर्ण बैठक पार पडली. या बैठकीला देशभरातील १९ शेत करी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत शेतकऱ्यांच्या मूलभुत व अत्यावश्यक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवुन आणणे तसेच कृषी क्षेत्रात शाश्वत विकासाला चालना देणे, या उद्देशाने देशभरात कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या (एमसीए) अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्या कार्यरत आहेत. या कंपन्यांना संचालन, व्यव स्थापन, तांत्रिक मार्गदर्शन आणि शासन-प्रशासना कडुन वेळोवेळी आवश्यक सहकार्य मिळावे, यासाठी राष्ट्रीय स्तरावर फेडरेशन स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. देशातील विविध राज्यांतील फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्या प्रतिनिधींना एकत्र आणुन स्थापन करण्यात आलेल्या या फेडरेशनची कार्यकारिणी ही जाहीर करण्यात आली. त्यानुसार निळकंठ मस्के यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली असुन उपाध्यक्षपदी दत्तात्रय कदम व रोहिणी पाटील, सचिव पदी प्रकाश खेडकर, कोषाध्यक्षपदी अनिल ठाकरे, सहसचिवपदी रामप्रसाद काळे व पंढरीनाथ जाधव यांची निवड करण्यात आली. तसेच सदस्य म्हणुन मुकेश खरात, विष्णु जाधव यांच्यासह विविध एफपी सीच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला आहे.
राष्ट्रीय फार्मर प्रोड्युसर कंपनी फेडरेशनच्या स्थापनेसाठी शैलेश शेळके आणि अभिषेक डाफ यांनी विशेष परिश्रम घेतल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. शेतकरी उत्पादक कंपन्यांना राष्ट्रीय स्तरा वर सक्षम व्यासपीठ उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणे वाचा फोडली जाईल तसेच कृषी क्षेत्रातील समन्वय, तांत्रिक सक्षमीकरण आणि धोरणात्मक सहकार्याला नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.





