spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

चिंतामणी मंदिरात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा उत्साह; रक्तदान शिबिराला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हंसराज,भंडारा :- गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर माधवनगर येथील चिंतामणी मंदिर परिसरात २९ जुलै रोजी गुरुपौर्णिमा महोत्सव अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यात्म आणि सामाजिक बांधिलकीचा संगम साधत या महोत्सवात विविध धार्मिक व सेवाकार्याचे आयोजन करण्यात आले होते.

रक्तदान शिबिरातून सामाजिक सेवा या महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे आयोजित करण्यात आलेले भव्य रक्तदान शिबीर. गरजू रुग्णांचे प्राण वाचविण्याच्या उदात्त हेतूने राबवण्यात आलेल्या या उपक्रमाला रक्तदात्यांचा मोठा प्रतिसाद लाभला. सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या या सेवाकार्याचे आयोजन विद्या इंगोले, सतीश ठाकरे व सुधीर पाटील यांच्या पुढाकाराने आणि सहकार्याने करण्यात आले. अनेक तरुणांनी व साधकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून आपले अमूल्य योगदान दिले.

भक्तिमय सत्संग आणि महाप्रसाद महोत्सवाच्या दुसऱ्या सत्रात सायंकाळी गुरुपूजा आणि सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग’ सत्संग टीम, भंडारा यांनी सादर केलेल्या सुमधुर भजनांनी आणि सत्संगाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. या सकारात्मक ऊर्जेने भारलेल्या वातावरणात भाविक मंत्रमुग्ध झाले होते. सत्संगानंतर आयोजित महाप्रसादाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला.

या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी चिंतामणी मंदिर परिसरातील साधक, स्वयंसेवक आणि भाविकांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांतर्फे सर्व रक्तदात्यांचे, सहकार्य करणाऱ्यांचे आणि उपस्थित भक्तांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. “गुरुदेवांची कृपा आणि आशीर्वाद सर्वांवर सदैव राहो,” अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

Popular Articles