spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पुसद येथे नेत्ररोग तपासणी शिबीर संपन्न

– आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय व पुसद रोटरी क्लबद्वारे आयोजन

– 114 विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी

यवतमाळ :- छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय व रोटरी क्लब, पुसद यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी दि. 19 फेब्रुवारी रोजी डॉ. उमेश रेवणवार हॉस्पिटल, पुसद येथे नेत्ररोग तपासणी शिबीर संपन्न झाले.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पुसद अंतर्गत कार्यरत असलेल्या 8 शासकीय आश्रमशाळांमध्ये एकूण 2766 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये 1159 मुले व 1607 मुलींचा समावेश आहे. आरबीएसके पथकाच्या प्राथमिक नेत्र तपासणीत आठही शाळांतील 114 विद्यार्थ्यांना नेत्रदोषाच्या तक्रारी आढळून आल्या होत्या.

या शिबिरात नेत्रदोष आढळलेल्या 114 विद्यार्थ्यांची अद्ययावत यंत्रणांच्या सहाय्याने नेत्र तपासणी करण्यात आली. तसेच आवश्यक ते उपचार व मार्गदर्शन करण्यात आले. नेत्रतज्ज्ञ डॉ. उमेश रेवणवार यांनी विद्यार्थ्यांना डोळ्यांची काळजी, स्वच्छता व नियमित तपासणीचे महत्त्व समजावून सांगितले. यावेळी दंतरोगतज्ज्ञ डॉ. विशाल गोटे यांनीही विद्यार्थ्यांना दातांची स्वच्छता व निगा राखण्याबाबत मार्गदर्शन केले. शिबिरास मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर लवकरच दंतरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले.

याप्रसंगी उपविभागीय अधिकारी पुसद आशिष बिजवल व प्रकल्प अधिकारी अमोल मेतकर यांनी विद्यार्थ्यांना वैयक्तिक व सामूहिक स्वच्छतेचा मूलमंत्र देत आरोग्याबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले.

शिबिरात रोटरी क्लबचे अध्यक्ष श्रीराम पदमावार, सचिव रोटरी क्लबचे गणेश पाटील, प्रोजेक्ट डायरेक्टर डॉ. सतीश चिद्दरवार, डॉ. विनीत रेवणवार, सदस्य आश्विन आडे, विजय ठाकरे यांच्यासह प्रकल्प कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व संबंधित आश्रमशाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.