spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवसा विजेसाठी महिनाअखेरपर्यंत पूर्ण वाहिन्या कार्यान्वित करण्याचे निर्देश

नागपूर :- नागपूर जिल्ह्यातील शेतीला समृद्धीचा आधार देण्यासाठी आणि बळीराजाला रात्रीच्या वेळेस शेतात राबण्याच्या त्रासातून कायमची मुक्ती देण्यासाठी महावितरणने ‘आरडीएसएस वाहिनी विलगीकरण’ (RDSS Feeder Separation) योजनेतील कामांना अत्यंत उच्च प्राधान्य दिले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवसा पूर्ण दाबाने, सुरक्षित आणि अखंडित वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महावितरणच्या वतीने या कामांचा वेग वाढवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर महावितरण मुख्यालयातील प्रकल्प विभागाचे अधीक्षक अभियंता देवेंद्र उंबरकर यांनी काटोल रोड येथील विद्युत भवन येथे आयोजित विशेष बैठकीत नागपूर परिमंडलातील या योजनेच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला.

या आढावा बैठकीदरम्यान ज्या वाहिन्यांचे काम 100 टक्के पूर्ण झाले आहे, अशा सर्व वाहिन्यांचे ‘कार्यान्वयन’ (Commissioning) चालू ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करून त्या तातडीने प्रत्यक्ष सेवेत दाखल करण्याचे स्पष्ट व कडक निर्देश उंबरकर यांनी महावितरणचे अधिकारी आणि कंत्राटदार एजन्सीला दिले आहेत.

केंद्र सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि कालमर्यादित ‘आरडीएसएस’ योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील कृषी आणि बिगर-कृषी (गावठाण व व्यावसायिक) ग्राहकांची वीज वाहिनी पूर्णपणे वेगळी करण्याचे काम नागपूर जिल्ह्यात वेगाने सुरू आहे. या विलगीकरणामुळे वीज वितरणातील तांत्रिक अडचणी दूर होऊन संपूर्ण प्रणाली अधिक सक्षम, आधुनिक आणि विश्वासार्ह होणार आहे. विजेच्या वाढत्या मागणीचे सुयोग्य नियोजन करणे महावितरणला शक्य होईल. या प्रकल्पाचा थेट आणि सर्वात मोठा फायदा जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना होणार असून, त्यांना आता रात्रीच्या अंधारात शेताला पाणी देण्याच्या धोक्यापासून दिलासा मिळणार आहे. पिकांना आवश्यकतेनुसार दिवसाच भरवशाचा आणि पुरेसा वीजपुरवठा उपलब्ध होणार असल्याने शेती उत्पादकतेतही मोठी वाढ होणार आहे.

बैठकीचनंतर प्रकल्पांची प्रत्यक्ष स्थिती जाणून घेण्यासाठी अधीक्षक अभियंता देवेंद्र उंबरकर आणि नागपूर परिमंडलाच्या इन्फ्रा विभागाच्या अधीक्षक अभियंता दिपाली माडेलवार यांनी अधिकाऱ्यांच्या ताफ्यासह क्षेत्रीय पाहणी केली. त्यांनी सावनेर विभागातील फेटरी उपकेंद्रातील 11 केव्ही बुढला वाहिनी, काँग्रेसनगर विभागातील फेटरी वाहिनी तसेच काटोल तालुक्यातील 4 वाहिन्यांच्या कामांची प्रत्यक्ष स्थळावर जाऊन पाहणी केली. पाहणीदरम्यान कामाचा दर्जा तपासून उर्वरित किरकोळ कामे तातडीने संपवण्याच्या सूचना देण्यात आल्या. हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी महावितरणचे अभियंता व मे. पॉलीकॅब इंडिया लिमिटेडच्या प्रतिनिधींनी आपापसातील समन्वय अधिक मजबूत करून युद्धपातळीवर काम करावे, असे निर्देशही उंबरकर यांनी दिले.

या बैठकीस नागपूर इन्फ्रा विभागाचे सर्व सहाय्यक अभियंता, कर्मचारी आणि मे. पॉलीकॅब इंडिया लिमिटेडचे प्रतिनिधी सचिन महंत व मंगेश गुढाधे यांची प्रमुख उपस्थिती होती. फिडर विलगीकरणाची ही सर्व कामे निर्धारित वेळेत पूर्ण झाल्यामुळे संपूर्ण नागपूर जिल्ह्यातील वीजपुरवठ्याचे जाळे अधिक सुदृढ होणार असून, सर्वच वर्गवारीतील ग्राहकांना दर्जेदार व विनाखंड सेवेचा लाभ मिळणार आहे.

Popular Articles