spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

वीज कोसळून चौघांचा मृत्यू; नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा व धामणगावमध्ये दुर्घटना

 

नागपूर: नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा (ता. कळमेश्वर) आणि धामणगाव (ता. मौदा) शिवारात बुधवारी (दि. २७) वीज कोसळल्याने चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये आई आणि तिच्या तरुण मुलाचा समावेश आहे.

धापेवाडा येथील घटना:

धापेवाडा शिवारातील शेतात पहाटेपासून खत टाकण्याचे काम सुरू होते. याचवेळी अचानक वीज कोसळली. या घटनेत वंदना प्रकाश पाटील (३९), त्यांचा मुलगा ओम प्रकाश पाटील (२२) आणि शेतमजूर निर्मला रामचंद्र पराते (६५) यांचा जागीच मृत्यू झाला. हे तिघेही धापेवाडा येथील रहिवासी होते.

विशेष म्हणजे, ओम हा काही वेळापूर्वीच कळमेश्वर येथून गणपतीची मूर्ती घेऊन घरी परतला होता आणि लगेच आईला मदत करण्यासाठी शेतात गेला होता. गणपती बसवण्याच्या तयारीच्या वेळीच ही दुर्घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

धामणगाव येथील घटना:

दुसरी घटना धामणगाव शिवारात घडली. सागर पंढरी जुमडे (२७, रा. धामणगाव) हा सायंकाळी कढोली येथून आपल्या गावी परत येत होता. अचानक पाऊस सुरू झाल्याने तो रस्त्यालगतच्या झाडाखाली थांबला. त्याच वेळी झाडावर वीज कोसळली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या सागरला तात्काळ रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या दोन्ही घटनांमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी या घटनांची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

Popular Articles