– सफाई कामगारांसह ५७९ उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वाटप
– आपली बससाठी व्हॅाटसॲप तिकीट प्रणालीचा शुभारंभ
नागपूर :- जागतिक बँकेच्या अहवालानुसार येत्या दहा वर्षात नागपूर शहर जलदगतीने विकसित होत असून पायाभूत सुविधांच्या विकासामुळे शहराचा चेहरा बदलत आहे. एक वैश्विक शहर नवी ओळख निर्माण होत असल्यामुळे शहराच्या सुनियोजित विकासासाठी निधी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
महानगरपालिकेच्या हिरवळीवर आयोजित विशेष समारंभात शहरातील ४७६ सफाई कामगारांना कायम नियुक्तीपत्र तसेच सरळसेवा भरतीने १०३ युवकांना नियुक्तीपत्राचे वाटप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी होते.

यावेळी राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नीता ठाकरे, आमदार सर्वश्री मोहन मते, कृष्णा खोपडे, उपमहापौर लिलाताई हाथीबेड, राज्य सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष शेरसिंह डागोर, स्थायी समितीच्या अध्यक्षा शिवानी दाणी, महापालिका आयुक्त डॅा. विपीन इटनकर, अतिरिक्त आयुक्त मुरगनाथन एम.,अंकित आदी अधिकारी तसेच विविध समित्यांचे सभापती, पदाधिकारी व नगरसेवक यावेळी उपस्थित होते.
शहर स्वच्छ व सुंदर राहिल्यास त्याचा सार्वजनिक आरोग्यावरही परिणाम होत असल्यामुळे स्वच्छतादुतांची आस्थापना खर्च जास्त असल्यामुळे नियुक्तीसाठी विशेष सूट देण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणात भरती झाल्याचे सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लाड-पागे समितीच्या शि्फारशीनुसार ४७६ स्वच्छतादूतांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहेत. या समितीने सेवाविषयक बाबींचा अहवालानुसार शासन निर्णय निघुनही भरती होत नव्हती. या अहवालाच्या अंमलबजावणीला प्राधान्य दिल्यामुळे सफाई कामगारांचे विविध प्रश्न सोडविण्यात आल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
स्वच्छता कर्मचा-यांना नागपूर महानगरपालिकेने नियुक्तीपत्रे देण्यासोबतच त्यांच्यासाठी मोफत घरकुल देण्याची योजना राज्यात सर्वात प्रथम राबविली आहे. ३०० चौरस फुटांच्या मोफत घरांसोबतच अधिकच्या बांधकामासाठी अतिरिक्त शुल्क भरल्यास मोठे घर देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे यावेळी सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, शहर स्वच्छ राहावे, आरोग्य चांगले राहावे यासोबतच स्वच्छता दुतांच्या जीवनात परिवर्तन सुद्धा घडविण्यासाठी विशेष योजना राबविण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी जाहिर केले.

नागपूर शहराचा वेगाने होत असलेला विकास व त्यासोबतच पायाभूत सुविधा, उंच इमारती यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेऊन महानगरपालिकेने स्वच्छतेच्या दृष्टीने प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी सफाई कामगारांच्य पाल्यांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण सुरू करावे, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.
महानगरपालिकेच्या ऐतिहासिक हिरवळीवर राष्ट्रपतींसह अनेक मान्यवर व कलावंतांचे सत्कार समारंभ येथे आयोजित करण्यात आले आहेत. ही हिरवळ म्हणजे महानगरपालिकेच्या इतिहासाची साक्ष आहे. महापौर म्हणून व त्यापूर्वीही अनेक समारंभांना उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले आहे. त्यामुळे महानगरपालिकेचा कार्यक्रम हिरवळीवरच आयोजित करावा अशी सुचना केली होती. त्याअनुषंगाने या कार्यक्रमाचे आयोजन होत असल्याचे तसेच येथील कार्यक्रमांच्या स्मृतींना यावेळी मुख्यमंत्र्यांनी उजाळा दिला.
अध्यक्षीय भाषणात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, शहराच्या विकासासोबतच स्वच्छता, खेळाचे मैदान व नागरिकांसाठी मुलभूत सुविधांचा विकास करताना येथील स्वच्छतेला प्राधान्य देण्याची आवश्यकता व्यक्त केली. नवनियुक्त कर्मचा-यांना पारदर्शक व गतीमान प्रशासन देण्याची आवश्यकता व्यक्त करताना प्रत्येक प्रभागामध्ये खेळाची मैदाने २४ तास पाणीपुरवठा तसेच बेरोजगार युवकांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षणाला प्राधान्य द्यावे, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

प्रारंभी महापौर नीता ठाकरे यांनी स्वागत करून प्रास्ताविकामध्ये शहराच्या स्वच्छतेसाठी आवश्यक असलेल्या स्वच्छतादुतांच्या नियुक्त्यांसाठी विशेष सहकार्य केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले. आपली बस ही सेवा अधिक लोकाभिमुख व्हावी यादृष्टीने व्हॅाटसअपद्वारे बसचे तिकीट देण्याचा शुभारंभ होत असल्यामुळे शहर अधिक स्मार्ट होणार असून स्वच्छता कर्मचा-यांसाठी घरकू योजना राबविण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आभार उपमहापौर श्रीमती लिना हाथीबेड यांनी मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मनिष सोनी यांनी केले.





