राज्यमंत्री तथा सह-पालकमंत्री गडचिरोली जिल्हा आशिष जयस्वाल यांच्या हस्ते हिरवा झेंडा फडकवून बाईक रॅलीचा शुभारंभ
तिरंगा बाईक रॅलीमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सारथ्य – 300 हून अधिक पोलीस अधिकारी / अंमलदारांचा सहभाग
पोलीस अधीक्षक कार्यालय येथे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहण
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती शौर्य पदक प्राप्त अधिकारी व अंमलदार यांना कार्यक्रमप्रसंगी प्रशस्तिपत्र प्रदान
नवजीवन वसाहत येथे आत्मसमर्पित माओवादी सदस्यांसोबत पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहण
आत्मसमर्पित जहाल माओवादी गिरीधर तुमरेटी याने आत्मसमर्पणानंतर पहिल्यांदाच आपल्या स्वगावी जाऊन केला स्वातंत्र्य दिन साजरा
गडचिरोली १६ : 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले, म्हणून संपूर्ण देशात हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी शूरवीरांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण केले जाते. यावर्षी 15 ऑगस्ट 2025 रोजी 79 वा स्वातंत्र्य दिनानिमित्त गडचिरोली पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला गडचिरोली पोलीस दलातील 07 अधिकारी व अंमलदार यांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक जाहीर झाले होते. या कार्यक्रमात त्यांचा प्रशस्तिपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच 14 ऑगस्ट रोजी पदोन्नती मिळालेल्या पोलीस अंमलदारांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. त्यानंतर पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या व शहीद कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
यानंतर नवजीवन वसाहतीत आयोजित कार्यक्रमादरम्यान आत्मसमर्पित माओवादी सदस्यांसोबत ध्वजारोहण करण्यात आले. आत्मसमर्पित गिरीधर तुमरेटी याने आत्मसमर्पणानंतर पहिल्यांदाच आपल्या मूळ गावी मौजा जवेली खुर्द येथे भेट देऊन ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद शाळेत आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात सहभागी होत स्वातंत्र्य दिन साजरा केला.
गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने भव्य तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीचा शुभारंभ राज्यमंत्री तथा सह-पालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. सदर रॅलीमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 300 हून अधिक पोलीस अधिकारी व अंमलदार सहभागी झाले. गडचिरोली पोलीस मुख्यालय ते इंदिरा गांधी चौक या मार्गावर काढलेल्या रॅलीतून देशसेवा, शौर्य आणि त्यागाचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमास खासदार गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ डॉ. नामदेव किरसान, माजी खासदार अशोक नेते, आमदार गडचिरोली विधानसभा मतदारसंघ मिलींद नरोटे, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सुहास गाडे, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., सहा. जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी रणजित यादव आणि सहा. पोलीस अधीक्षक धानोरा अनिकेत हिरडे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मागील वर्षी जून 2024 मध्ये गडचिरोली विभागीय समितीचा प्रभारी गिरीधर तुमरेटी याने मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आत्मसमर्पण केले होते. यावर्षीच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनी त्याने पहिल्यांदाच आपल्या मूळ गावी जाऊन ग्रामस्थांसोबत स्वातंत्र्य दिन साजरा केला आणि संविधानाप्रती आदर व्यक्त केला.
माओवादी गट अतिदुर्गम भागांमध्ये स्वातंत्र्य दिनी काळे झेंडे फडकविण्याचा प्रयत्न करत असले तरी गडचिरोली पोलीस दलाने त्यांचे मनसुबे हाणून पाडत विविध पोस्टे, उपपोस्टे व पोलीस मदत केंद्रांमध्ये ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात पार पाडला. विशेष बाब म्हणजे उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड अमर मोहिते यांनी पोलीस पथकासह अभियान राबवून नारगुंडा हद्दीतील मर्दहूर येथे ध्वजारोहण करत नागरिकांसोबत स्वातंत्र्य दिन साजरा केला. तसेच विविध ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांची रॅली, अंमली पदार्थ विरोधी शपथ व जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. अतिदुर्गम गावांमध्ये विद्यार्थी व ग्रामस्थांच्या सहभागाने मिरवणुका काढण्यात आल्या. यासोबतच नव्याने उभारलेल्या पोस्टे नेलगुंडा व पोस्टे कवंडे येथे पहिल्यांदाच ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.
पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पोस्टे, उपपोस्टे व पोलीस मदत केंद्रांमध्ये 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.




